डीआरआय कार्यालयातून पळालेल्या आरोपीला अटक; अहमदाबाद येथून घेतले ताब्यात
By मनोज गडनीस | Published: October 2, 2023 08:01 PM2023-10-02T20:01:45+5:302023-10-02T20:02:24+5:30
डीआरआय आणि पोलिस अशा दोन्ही यंत्रणा त्याचा शोध घेत होत्या.
मनोज गडनीस, मुंबई - सोने तस्करी प्रकरणात अटक झालेला आणि मुंबईतून केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) कस्टडीतून पसार झालेल्या आरोपीला डीआरआयच्या अहमदाबाद येथील अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री अटक केली. गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास तो मुंबईच्या डीआरआय कार्यालयातून पसार झाला होता. त्यानंतर डीआरआय आणि पोलिस अशा दोन्ही यंत्रणा त्याचा शोध घेत होत्या.
मेहूल अशोक कुमार जैन असे या २७ वर्षीय आरोपीचे नाव आहे. तो मूळचा अहमदाबाद येथील रहिवासी आहे. तो पसार झाल्यानंतर अहमदाबाद येथे येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्या अहमदाबाद येथील घरापाशी तसेच त्याच्या ओळखीच्या लोकांशी संबंधित ठिकाणी सापळा रचत त्याला अटक केली. जून महिन्यात अहमदाबाद येथे सोन्याच्या तस्करीच्या एका प्रकरणाचा अहमदाबाद डीआयआयने पर्दाफाश केला होता. त्यावेळी या आरोपीचे नाव पुढे आले होते. मात्र, त्यावेळी तो सापडू शकला नव्हता. त्यानंतर डीआरआयने त्याच्या विरोधात लूक आऊट नोटिस जारी केली होती.
गेल्या आठवड्यात बुधवारी तो दुबई येथे जाण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला होता. मात्र, त्याच्या विरोधात लूक आऊट नोटिस जारी असल्याचे इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याला डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. डीआरआयचे अधिकारी त्याला अटक करून चर्चगेट येथील कार्यालयात घेऊन गेले होते. मात्र, रात्री अडीचच्या दरम्यान त्याने स्वतःच्या केसशी संबंधित कागदपत्रे गोळा करत डीआरआयच्या कार्यालयातून पळ काढला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांत देखील त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. अखेर शनिवारी रात्री त्याला अहमदाबाद येथे अटक करण्यात आली आहे.