लैगिंक अत्याचारासाठी चिमुकल्याची हत्या; दुकानाच्या छतावर पाच दिवसांनी सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 07:58 PM2024-11-19T19:58:23+5:302024-11-19T20:00:35+5:30
लैगिंक अत्याचारासाठी नऊ वर्षाच्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे.
Mumbai Crime : मुंबई पोलिसांनी नऊ वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. ७ नोव्हेंबर रोजी नऊ वर्षांच्या मुलाचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर मुंबईतून पळून गेलेल्या एका ३१ वर्षीय बिहारमधील आरोपीला अटक करण्यात आली. मुलाच्या घरापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर त्याचा मृतदेह आढळला होता. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी मुलाच्या घरापासून ते त्याचा मृतदेह सापडलेल्या ठिकाणापर्यंतचे ४० सीसीटीव्ही तपासल्यानंतर महेश्वर मुखिया नावाच्या आरोपीला अटक केली आहे.
आरोपी महेश्वर मुखिया हा एका कपड्याच्या दुकानात काम करत होता अशी माहिती समोर आली आहे. मुखियाने ७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सांताक्रूझ (पश्चिम) येथील त्याच्या चाळीतील घराबाहेर मित्रांसोबत खेळत असलेल्या पीडित मुलाचे अपहरण केलं होतं. अपहरणाच्या वेळी नऊ वर्षांच्या मुलाने मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर घाबरल्यामुळे मुखियाने त्याचा गळा दाबून खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.पोलिसांना प्रथमदर्शनी असा संशय आहे की आरोपीने लैंगिक अत्याचारासाठी गुन्हा केला आहे. मात्र तपास अधिकारी अद्याप हत्येचा नेमका हेतू शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा सांताक्रूझ येथे कुटुंबासह राहत होता. ७ नोव्हेंबर रोजी त्याचे आई-वडील जुहू बीचवर छठपूजेसाठी गेले होते. जेव्हा ते संध्याकाळी घरी परतले तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा बेपत्ता असल्याचे आढळले. त्यांनी त्याचा शोध सुरू केला. बराच वेळ मुलगा न सापडल्याने त्याच्या कुटुंबीयांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. ११ नोव्हेंबर रोजी सांताक्रूझ येथील एका दुकानाच्या छतावर पोलिसांना एक कुजलेला मृतदेह आढळला. मृतदेहावरच्या कपड्यांवरून या मुलाची ओळख पटली.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा मुलगा महेश्वरसोबत फिरत असल्याचे आढळून आले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही महेश्वरचा शोध सुरू केला तेव्हा आम्हाला कळले की तो त्याच भागातील रहिवासी होता आणि तो नुकताच बिहारला निघून गेला होता. पोलिसांच्या पथकाने त्याला शनिवारी बिहारमधून अटक करून मुंबईत आणले. “आम्ही त्याला कोर्टात हजर केले असून त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. चौकशीदरम्यान मुखियाने लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याची कबुली दिली," असं पोलिसांनी सांगितले.