विवाहासाठी पॅरोलवर बाहेर पडलेला आरोपी अखेर अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 05:16 AM2019-03-09T05:16:01+5:302019-03-09T05:16:06+5:30
हत्येच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना, प्रेयसीसोबत विवाह करण्यासाठी तो पॅरोलवर बाहेर आला.
मुंबई : हत्येच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना, प्रेयसीसोबत विवाह करण्यासाठी तो पॅरोलवर बाहेर आला. विवाहानंतर पसार होत पुण्यात ओळख लपवून त्याने संसार थाटल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कारवाईत समोर आली आहे. पाच वर्षांनी त्याला शुक्रवारी पुण्यातून अटक करण्यात आली. बाळू प्रकाश चव्हाण (३४) असे आरोपीचे नाव आहे.
चव्हाण हा मुलुंडचा रहिवासी आहे. हत्येच्या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. तो नाशिकच्या कारागृहात कैद होता. २८ आॅगस्ट, २०१४ रोजी त्याला विवाहासाठी १४ दिवसांचा पॅरोल मंजूर झाला. पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर त्याने प्रेयसीसोबत विवाह केला. त्यानंतर, तिच्यासह तो पसार झाला.
याबाबत मुंबई पोलिसांना समजताच, गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने तपास सुरू केला. तपासात, चव्हाण हा पुण्यात ओळख लपवून पत्नी हिना आणि दोन मुलांसोबत राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार, शुक्रवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय महेश पाटणकर, पीएसआय लोहकरे यांच्या पथकाने कसून तपास केला. तपासाअंती हाती आलेल्या माहितीनुसार त्यांनी पुण्यात सापळा रचला. त्यानंतर शुक्रवारी त्याला पुण्यातून अटक केली. त्याची रवानगी पुन्हा नाशिक कारागृहात करण्यात आली आहे.