मुंबई : कर्नाटक पोलिसांनी लूक आऊट नोटीस बजावलेल्या २४ वर्षीय आरोपीने मुंबई विमानतळावर हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. मोहम्मद आफ्रिद असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवत, सहार पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील इमिग्रेशन अधिकारीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ जूनला ही घटना घडली. येथील एका महिला अधिकाऱ्याने सकाळी दहाच्या सुमारास दुबईतून मुंबईत आलेल्या मोहम्मद आफ्रिद या प्रवाशाला पकडून फिर्यादी यांच्यासमोर हजर केले. कर्नाटकातील सिध्दापुरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात मोहम्मद आफ्रिद हा पाहीजे आरोपी असून कोडागु जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी त्याच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावली होती.
तपासात मोहम्मद आफ्रिद हा तोच आरोपी असल्याचे स्पष्ट झाल्याने फिर्यादी यांनी त्याला इमिग्रेशन विंग इनचार्ज यांच्या चौकशी कक्षात बसवून ठेवले. मोहम्मद आफ्रिद याला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरु असतानाच साडे अकराच्या सुमारास त्याने स्वतः जवळील धारदार शस्त्राने डाव्या हाताच्या मनगटाची नस कापली. हा प्रकार लक्षात येताच येथील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेतील मोहम्मद आफ्रिद याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्याला तातडीने पुढील उपचारांसाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. कूपर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आल्यानंतर तक्रारदार यांनी सहार पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी आफ्रिद विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.