Join us

बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी उत्तर प्रदेश-हरियाणातील हल्लेखोर का आणले? धक्कादायक कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 3:42 PM

बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात पकडण्यात आलेल्या आरोपीने चौकशीत मोठा खुलासा केला आहे.

Baba Siddique Murder Case : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची आठवड्याभरापूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या पूर्वनियोजित कटात बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर मुलाच्या कार्यालयाबाहेर गोळ्या चालवल्या. या हल्ल्यात बाबा सिद्दीकी यांना चार गोळ्या लागल्या. त्यानंतर सिद्दीकी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर बाबा सिद्दीकी यांना मृत घोषित केलं. सिद्दीकींच्या हत्येनंतर घटनास्थळावरुन दोन हल्लेखोरांना पकडण्यात यश आलं तर एकाने पळ काढला. पोलीस तपासात या प्रकरणाविषयी रोज नवी माहिती समोर येत आहे. हल्लेखोर हे उत्तर प्रदेश आणि हरयाणातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपींच्या पोलीस चौकशीत सिद्धीकी यांना मारण्यासाठी उत्तर प्रदेश आणि हरयाणातील हल्लेखोर का नेमण्यात आले हे उघड झाले. पोलिसांनी या प्रकरणात राम कनोजिया याला अटक केली असून त्याने, बाबा सिद्दिकींच्या हत्येसाठी पहिल्यादांच मलाच विचारण्यात आलं होतं, असे सांगितले. कनोजियाने पोलिस चौकशीदरम्यान सांगितले की, यापूर्वी शुभम लोणकरने मला आणि नितीन सप्रेला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची सुपारी दिली होती. मी महाराष्ट्राचा रहिवासी असल्याने सिद्दिकीच्या हत्येचे काय परिणाम होऊ शकतात याची कल्पना मला आली होती. त्यामुळे ही सुपारी घेणार नाही, असे कनोजियाने सांगितले.

सुपारी घ्यावी लागू नये म्हणून खून करण्यासाठी त्याने एक कोटी रुपयांची मागणी केली होती. एवढी मोठी मागणी ऐकून शुभमने माघार घेतली आणि दुसऱ्या राज्यातील हल्लेखोरांना या कामासाठी नेमण्याचे ठरवले. शुभमला कल्पना होती की उत्तर प्रदेश-हरियाणातील लोकांना सिद्दीकींविषयी माहिती नसेल. तसेच ते कमी पैशात हत्या करण्यास तयार होतील. शुभम लोणकरने हे काम धर्मराज कश्यप, गुरमेल सिंग आणि शिवकुमार गौतम यांना दिले. धर्मराज आणि शिवकुमार हे उत्तर प्रदेशातील बहराइचचे रहिवासी आहेत. तर गुरमेल हा हरियाणाचा रहिवासी आहे.

या हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपींच्या फोनमधून पोलिसांना बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांचाही फोटो सापडला होता. लॉरेन्स बिश्नोईच्या या गुंडांनी संवादासाठी स्नॅपचॅटचा वापर केल्याचेही तपासात समोर आले आहे. संवादानंतर ते चॅट डिलीट करायचा जेणेकरुन कोणाला कळू नये.

दरम्यान, सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणानंतर त्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कॉन्स्टेबललाही निलंबित करण्यात आले आहे. हत्येच्या वेळी कारवाई न केल्याने हवालदारावर कारवाई करण्यात आली आहे. हवालदाराची विभागीय चौकशी देखील सुरू आहे. मात्र, त्याच्या डोळ्यात मिरचीसारखे काहीतरी घुसले होते, त्यामुळे तो काहीच करू शकला नाही, असे हवालदाराचे म्हणणे आहे. 

टॅग्स :बाबा सिद्दिकीमुंबई पोलीसगुन्हेगारी