Join us  

ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला आरोपीचे आव्हान; नियुक्ती रद्द करण्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 6:45 AM

निकम यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अनेक हत्या प्रकरणांत आरोपी असलेला विजय पालांडे याने सोमवारी ॲड. उज्ज्वल निकम यांच्या विशेष सरकारी वकील म्हणून केलेल्या नियुक्तीला  न्यायालयात आव्हान दिले आहे. आपल्या खटल्यात उज्ज्वल निकम यांची वाईट हेतूने नियुक्ती करण्यात आली आहे, असे पालांडेने अर्जात म्हटले आहे. ॲड. उज्ज्वल निकम भाजपतर्फे निवडणूक लढले. त्यामुळे त्यांची ओळख, हेतू, विचार, अजेंडा बदलेला आहे. ते आता भाजपचे नेते आहेत, असे पालांडे याने याचिकेत म्हटले आहे. 

निकम यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा १६,०००हून अधिक मतांनी पराभव केला. ॲड. निकम यांची पालांडेच्या खटल्यात पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  

भाजप सरकारने निकम यांची नियुक्ती कुहेतूने केली असून त्यांच्या पक्षाच्या विचारधारेचा प्रचार निकम करतील. आता लोकांच्या नजरेत निकम यांचा हेतू, अजेंडा पूर्णपणे बदलला आहे. ते आता राजकीय पक्षाच्या अजेंड्यासाठी काम करतील. भाजपची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी ते हाय-प्रोफाइल प्रकरणांतील कथित आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून कोणत्याही थराला जातील आणि ते आरोपीच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असेल, असे पालांडेने अर्जात म्हटले आहे. 

पालांडेची मागणी काय?आरोपींचे मूलभूत हक्क जपण्यासाठी निकम यांना आपल्या खटल्यापासून दूर ठेवण्यात यावे. त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी पालांडे याने न्यायालयाकडे केली आहे. न्यायालयाने या अर्जावरील सुनावणी २८ जून रोजी ठेवली आहे.

पालांडे कोण आहे?२०१२ पासून पालांडे न्यायालयीन कोठडीत आहे. दिल्ली  व्यावसायिक  अरुण टिक्कू आणि फिल्म प्रोड्यूसर करणकुमार कक्कड यांची हत्या केल्याचा आरोप पालांडेवर आहे.

टॅग्स :मुंबईउज्ज्वल निकम