Join us

विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर फेकले अ‍ॅसिटोन

By admin | Published: January 17, 2017 6:36 AM

शंभर रुपयांसाठी नववीच्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर त्याच्याच मित्राने अ‍ॅसिटोन फेकल्याची धक्कादायक घटना नागपाड्यात घडली

मुंबई : शंभर रुपयांसाठी नववीच्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर त्याच्याच मित्राने अ‍ॅसिटोन फेकल्याची धक्कादायक घटना नागपाड्यात घडली. जखमी मुलावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यापैकी दोघे अल्पवयीन आहेत.तक्रारदार विद्यार्थी मालाड येथील रहिवासी आहे. नागपाडा परिसरात तो आत्याकडे आला होता. दरम्यान परिसरातील आॅर्चिड टॉवरमधील पार्किंग लॉटमध्ये तो मित्रांना भेटला. तेथे आरोपी जियाद असाद सिद्दिकीसह अन्य दोन अल्पवयीन मित्र होते. त्यांनी नेहमीप्रमाणे तक्रारदार विद्यार्थ्याकडे पैशांची मागणी केली. १०० रुपये तरी दे, असा हट्ट धरला. मात्र त्याने नकार दिला. याच रागातून त्यांनी सोबत आणलेले अ‍ॅसिटोन त्याच्या चेहऱ्यावर फेकले. त्याला मारहाण केली. यामध्ये तो जखमी झाला. नागपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बसवत यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. पैशांवरून वाद झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी झियादसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. झियादला हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक झाली. अन्य आरोपींची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली. (प्रतिनिधी)>मुलाची प्रकृती स्थिर आरोपींच्या वाढत्या पैशांच्या मागणीला तक्रारदार विद्यार्थी कंटाळला होता. त्याने पैसे देण्यास नकार दिला म्हणून त्याच्यावर हा हल्ला चढविल्याचे तक्रारदार मुलाचे म्हणणे आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त प्रवीण पडवळ यांनी दिली आहे.