Join us

निशील घोडकेचे घवघवीत यश

By admin | Published: June 01, 2017 6:01 AM

जन्मताच प्रमस्तिष्कघातग्रस्त झालेल्या निशील घोडके याने आपल्या असाध्य व्याधींवर मात करत, पुन्हा एकदा देदीप्यमान यश मिळविले आहे.

मनोहर कुंभेजकर /लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जन्मताच प्रमस्तिष्कघातग्रस्त झालेल्या निशील घोडके याने आपल्या असाध्य व्याधींवर मात करत, पुन्हा एकदा देदीप्यमान यश मिळविले आहे. निशीलने दोन वर्षांपूर्वी सातव्या इयत्तेतून थेट दहाव्या इयत्तेत दाखल होत, शालांत परीक्षेत ७४ टक्के गुण मिळवले होते. निशीलने त्यानंतर विलेपार्ले येथील एन. एम. वाणिज्य महाविद्यालयात किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रमांतर्गत (एमसीव्हीसी) ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम हा अभ्यासक्रम निवडून, यंदा बारावीची परीक्षा दिली व त्यात त्याने पुन्हा यशाची पुनरावृत्ती करून, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत ७४.१५ टक्के गुण मिळवले आहेत. सर्वसामान्य मुलांपेक्षा ‘हम भी कुछ कम नही’ हेच त्याने जणू दाखवून दिले आहे.निशीलला गेल्या वर्षभरापासून घुर्णन पार्श्वनमनाचा त्रास (रोटेशनल स्कोलीओसीस) होत आहे. स्नायूंच्या जन्मजात कमकुवतपणामुळे त्याच्या पाठीच्या कण्याला बाक आल्याने त्याला सरळ व स्थिर बसतानाही खूप त्रास होतो. त्यामुळे तब्बेत पूर्वीपेक्षा जास्त गंभीर झाली आहे. तरीही त्याने महाविद्यालयात जाऊन अभ्यासक्रम पूर्ण केला. ऐन परीक्षेपूर्वी अचानकपणे केंद्र बदलल्याने व उदवाहनाची सोय नसलेल्या केंद्रात चौथ्या मजल्यावर आसन दिल्याने त्याला प्रचंड शारीरिक त्रास व मनस्तापाला सामोरे जावे लागले होते. ‘लोकमत’ने या प्रकरणाची दखल घेत, वाचा फोडल्यानंतर प्रशासनाने तत्काळ दखल घेतली व निशीलला तळमजल्यावरच्या मुख्याध्यापकांच्या कक्षात बसून पेपर लिहिण्याची सोय करण्यात आली, त्याची आठवण त्याचे वडील अजित घोडके यांनी दिली.अत्यंत विपरीत परिस्थितीवर मात करत, निशीलने मिळविलेल्या यशात त्याचे मुंबई महानगरपालिकेच्या बोरीवली येथील नागरी प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्र येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असलेले वडील अजित घोडके व विशेष शिक्षिका, तसेच योगशास्त्री असलेली आई सुचित्रा यांचे मोलाचे योगदान आहे. निशील ‘ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम’ याच विषयात पदवीधर होण्यास उत्सुक आहे. निशीलची कण्यावरची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर प्रसंगी मुंबई बाहेर जाऊनही पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जिद्द आहे. निशीलच्या चिकाटीला आणि जिद्दीला सलाम!निशीलने विलेपार्ले येथील एन. एम. वाणिज्य महाविद्यालयात किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रमांतर्गत (एमसीव्हीसी) ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम हा अभ्यासक्रम निवडून, यंदा बारावीची परीक्षा दिली व त्यात त्याने पुन्हा यशाची पुनरावृत्ती करून, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत ७४.१५ टक्के गुण मिळवले आहेत.