Join us

ती पहाट ...बदलेलं आयुष्य आणि जगण्याचा संघर्ष; मी स्वतंत्र कधी होणार ?

By मनीषा म्हात्रे | Published: August 14, 2022 12:28 PM

सात वर्षाची शिक्षा भोगून पती बाहेर आला. त्याने माफी मागून तिला पुन्हा सोबत येण्यास सांगितले. स्वतःचे घर नसल्याने मुलाच्या भविष्याचा विचार करत तिने पुन्हा त्याच्यासोबत संसार थाटला.

- मनीषा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रेमविवाहानंतर बदलत गेलेलं ते जीवन. नशेच्या आहारी गेलेल्या पतीने एका पहाटे तोंडावर फेकलेलं अ‍ॅसिड आणि त्या जखमासोबत उगवलेल्या त्या पहाटेने तिचं आयुष्यच बदलले.ती किंचाळली. मान जळाली. कान गळून पडले. चेहऱ्याचे मांस अक्षरश: लोंबले. कपाळाखालचा चेहरा विद्रूप झाला. डोळ्याची खाच तेवढी शिल्लक राहिली. जणू आयुष्यच करपले. आज त्या घटनेला ११ वर्ष उलटली मात्र काहीही चूक नसताना तिला मिळालेला हा डाग संपूर्ण आयुष्यबर सोबत घेवून जगायचा आहे. पराकोटीच्या वेदना सहन करूनही मुलाच्या भविष्यासाठी तिने मोठ्या मनाने त्याला माफ करत पुन्हा त्याच्याशीच संसार थाटला.

मात्र, आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असला तरी माझ्या जगण्याचा संघर्ष संपलेला नाही असे ऍसिड पीडित कविता शेट्टी सांगते.        आई-वडील, चार बहिणी अशा कुटुंबात वाढलेली कविता. शिक्षण कमी झाल्यामुळे लोकलमध्येच इमिटेशन ज्वेलरी विकून कुटुंबाचा उदर्निवाह सुरु केला. मूळची चेन्नईची असली तरी मुंबईतच लहानाची मोठी झाली. ती हौशी होती. स्वप्नं बघण्याचे तिला भारी वेड. स्वतःसाठी काही तरी करून मोठे व्हायचे अशी तिची इच्छा होती. कुटुंबाच्या परिचयातील नित्यानंद शेट्टीसोबत प्रेमसंबंध जुळले. वयाच्या १५ व्या वर्षीच २००५ मध्ये विवाहसोहळा पार पडला.  लग्नाच्या वर्षभरानंतरच पतीने दारूच्या नशेत संशय घेत मारहाण, शिवीगाळ सुरु झाली. याच, संशयातून २०१० ची ती पहाट कविताच्या आयुष्यात आली आणि आयुष्यभराच दुखणं बनून गेली.

      पहाटेच्या सुमारास दोन वर्षाच्या मुलाशेजारी झोपली असताना पतीने कविताच्या तोंडावर ऍसिड फेकले होते. डॉकटरांनीही ती काही तास जगू शकेल असे तिच्या आईला सांगितले. लोळागोळा झालेली लेक वाचत नाही' असे सांगून डॉक्टरांनीही कविताच्या आईला परत धाडले होते. मुलीच्या दुखण्याने कोसळलेली आई तिच्यासाठी मात्र खंबीर उभी राहिली. मुलीला तात्काळ दुसऱ्या रुग्णालयात हलवले. एकूण तीन शस्त्रक्रियांना ती धीर एकवटून सामोरी गेली. दुसरीकडे पतीला अटक झाली. शिक्षा होत कारागृहात रवानगी केली.

   विद्रुप झालेल्या चेहऱ्यामुळे वर्षभर कविताने स्वतःला कोंडून घेतले. स्वतःच्या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना आईच्या फुफ्फुसातील कॅन्सरचे निदान झाले. तिच्या बचावासाठी तिने पुन्हा काम करण्याचे ठरवले. नोकरी करणे शक्य नाही म्हणून पुन्हा सुंदरता खुलविणाऱ्या इमिटेशन ज्वेलरी घेऊन बोरिवली ते एल्फिस्टन्ट प्रवास सुरु झाला. मात्र लोकलमध्ये मुलं घाबरायला लागली. भूत भूत म्हणून रडायला लागली. काही जणींनी तोंड फिरवत नको ते बोलण्यास सुरुवात केली.  पोटासाठी तिने तोंड झाकून विक्री करायला सुरुवात केली आणि ऍलर्जी वाढल्याने ती पुन्हा ढासळली. मात्र, आईसाठी तिला थांबणे शक्य नव्हते. अन्य बहिणींच्या मदतीने तिने काम पुन्हा सुरु केले. लोकांना समजावून सांगितले. तर काही महिलांनी तिला आधारही दिला.

       दरम्यान आईचा मृत्यू झाला. हक्काचा आधार हरपल्याने ती मनाने कोसळली. त्यात, मुलाची जबाबदारी. तिने काम सुरु ठेवले. मुलाच्या शिक्षणाबरोबर लहान बहिणीला शिक्षणासाठी पुढाकार घेतला.  दुसरीकडे सरकारकडे मनोधैर्य योजनेसाठीचा लढा सुरु झाला. इथे दुःखाचे सत्र संपण्याचे नाव घेत नव्हते. वडिलांना ब्लड कँन्सर झाल्याची बाब समोर आली. अखेर, मनोधैर्य योजनेतून मिळालेल्या पैशातून वडिलांचा खर्च तसेच आईसह स्वतःच्या खर्चासाठी मदत झाली. काही व्यवसायाचे सामान खरेदी करून तिचा ट्रेनचा प्रवास सुरु ठेवला.     आता वर्षभरापूर्वी वडिलांनीही साथ सोडली. मात्र ती मागे हटली नाही. आजही अनेक जणांच्या नजरा तिला खुपतात. मुलं घाबरतात हे पाहून ती अस्वस्थ होते. अजूनही बोलताना तिचा श्वास थांबतो. कान दुखतो. त्वचेचा त्रास वेगळाच. मात्र तिने हिंमत कायम ठेवली. नव्याने सुरुवात केली. आता ती लोकलमध्ये स्कार्फविना फिरून व्यवसाय करते.  ती जगण्यासाठी लढते आहे. मी स्वतंत्र कधी होणार? असा प्रश्नही तिला वेळोवेळी सतावत असल्याचेही ती सांगते.पुन्हा त्याच्याशीच संसार  सात वर्षाची शिक्षा भोगून पती बाहेर आला. त्याने माफी मागून तिला पुन्हा सोबत येण्यास सांगितले. स्वतःचे घर नसल्याने मुलाच्या भविष्याचा विचार करत तिने पुन्हा त्याच्यासोबत संसार थाटला. त्यानंतर त्यांना आणखीन एक मुलगा झाला. सध्या दहिसर मध्ये राहण्यास असून एक मुलगा तेरावी तर एक नर्सरीमध्ये शिक्षण घेत आहे. किमान मुलाच्या भविष्यासाठी त्याला सरकारी नोकरी मिळावी यासाठी तिचे प्रयत्न सुरु आहे.