नवी मुंबई : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर पनवेलजवळील कोन गाव येथे पुण्यावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या टँकरला बुधवारी अपघात झाला. या टँकरमधील अॅसेडीक अॅसिड रस्त्यावर सांडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र सिडको आणि अग्निशमन दलाने अॅसिड धुतल्याने मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणी टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पहाटे ५.३० च्या सुमारास कोन टोलनाक्याजवळून वळण घेताना (एमएच ०६ के ४०४७ )या क्रमांकाच्या टँकरचे एक चाक जवळच असलेल्या खड्ड्यात गेल्याने हा अपघात झाला. यानंतर टँकरमधील असिड रस्त्यावर सांडले. नवीन पनवेल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किसन गायकवाड यांनी घटनास्थळवर धाव घेतली. अॅसिडगळतीमुळे यावेळी परिसरातील नागरिकांच्या डोळ्यात जळजळ होत होती. पनवेल नगरपरिषद व नवीन पनवेल सिडको अग्निशमन दलाच्या दोन गाड्या व जेसीबी मशिनच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले अॅसिड पाण्याने स्वच्छ करून त्याठिकाणी माती टाकण्यात आली. वाहन चालवताना हलगर्जीपणा केल्याप्रकरणी टँकरचालक यारमहम्मद इंसार अली (५२) याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी नवीन पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देशमुख व अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि सिडकोचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते . (प्रतिनिधी)
मुंबई-पुणे महामार्गावर अॅसिड गळती
By admin | Published: November 06, 2014 1:57 AM