पुरळ असू शकतो गोवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:09 AM2021-08-22T04:09:08+5:302021-08-22T04:09:08+5:30
वेळीच लक्षणे ओळखा, वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सध्या वातावरणातील बदलांमुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ...
वेळीच लक्षणे ओळखा, वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्या वातावरणातील बदलांमुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यात कोविडच्या संसर्गामुळे अधिक सतर्कता बाळगावी लागते. त्यात
लहानग्यांना ताप व अंगावर पुरळ आल्यास त्यातून गोवरचा धोका असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे बहुतांश वेळा अंगावर पुरळ आल्यास अनेक पालक खासगी इलाज करतात; परंतु असे न करता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही सूचित केले आहे.
गोवरमध्ये पुरळ प्रथम कपाळावर, कानामागे, मानेवर येतात. नंतर ते हाता-पायापर्यंत पसरते. रॅश किंवा पुरळ आल्यानंतर हळूहळू तापाचे प्रमाण कमी होते. पुरळ साधारणपणे आठवड्यानंतर हळूहळू कमी होत जाते. त्वचेवर त्याचे काळपट व्रण काही दिवस राहतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खोकला जाण्यास दोन आठवडे लागतात. हा आजार कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. गोवर झालेल्या रुग्णामध्ये शरीरातील ‘अ’ जीवनसत्त्वाची मात्रा खूप कमी होते. जीवनसत्त्व ‘अ’ कमी झाल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार, अतिसार, न्यूमोनिया, मेंदुज्वर असे आजार होण्याचा संभव असतो.
काही बालकांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’च्या कमतरतेमुळे अंधत्व येते. गोवरमुळे होणारा न्यूमोनिया हा बऱ्याच वेळा तीव्र स्वरूपाचा असतो. यामध्ये श्वासनलिकेला सूज येऊन बालकांना श्वसनाला त्रास होण्याची शक्यता असते. ताप व तापात येणारे झटके कधीकधी मेंदूच्या आवरणांना सूज येऊन कोमामध्ये जाण्याचा धोका काही बालकांमध्ये दिसून येतो, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. क्षितिज सोनी यांनी दिली.
निदान व उपचारांवर भर द्यावा
- डॉ. स्मिता पुरी, बालरोगतज्ज्ञ
मुलांना ताप येत असल्यास आणि अंगावर पुरळ येत असल्यास लगेच
फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने बदलत्या
हवामानामुळे गोवर संशियत आजार निर्माण होण्याची शक्यता असते. पालकांनी अशा वेळी
लगेच निदान व उपचारांवर भर द्यावा.
लसीकरण मोहीम
एमआर लसीकरण मोहिमेत नऊ महिने पूर्ण आणि १५ वर्षांपेक्षा कमी अशा सर्व बालकांना ही लस दिल्याने गोवर व रुबेला या दोन्ही रोगांची लागण
होण्याचे प्रमाण नगण्य असते. गोवर, तसेच रुबेलाचे रुग्ण वयाच्या १५ व्या वर्षापर्यंतही दिसून येतात. त्यामुळे १५ व्या वर्षापर्यंतच्या बालकांना लस दिल्याने जास्तीत जास्त प्रमाणात या आजारावर नियंत्रण मिळविता येईल. ही मोहीम झाल्यानंतर गोवर लसीऐवजी एमआर एक, एमआर दोन अशा पद्धतीने नेहमीचे लसीकरण केले जाईल.