Join us

खारमधून ६१ लाखांचे एमडी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 6:10 AM

खार परिसरातून जवळपास ६१ लाख रुपये किमतीचे एमडी हस्तगत करण्यात आले आहे.

मुंबई : खार परिसरातून जवळपास ६१ लाख रुपये किमतीचे एमडी हस्तगत करण्यात आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी खार पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. संजय पांडे (४८), सचिन मुदलियार (४२) आणि रोशनकुमार पांडे (३२) अशी त्या तिघांची नावे आहेत.अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) मनोजकुमार शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्या हद्दीतील अमलीपदार्थ विक्रेत्यांचा शोध घेण्याची जबाबदारी दिली होती. त्यानुसार खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबोली पोलीस ठाण्यातून खार पोलीस ठाण्यात रुजू झालेले पोलीस निरीक्षक दया नायक आणि नंदकुमार गोपाळे यांचे एक पथक तयार केले होते. खारमध्ये काही लोक मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती बुधवार, १७ एप्रिलला नायक यांना खबऱ्यांकडून मिळाली. त्यानुसार गोपाळे आणि पथकाच्या सहकार्याने नायक यांनी नॅशनल कॉलेज बसस्टॉप परिसरात सापळा रचला. त्यानुसार गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास तीन व्यक्ती त्या परिसरात संशयास्पदरीत्या वावरताना आढळल्या. तेव्हा नायक यांच्या पथकाने त्यांना हटकत त्यांची अंगझडती घेतली. तेव्हा त्यांच्याकडे १ किलो ५२६ ग्रॅम एमडी पोलिसांना सापडले. या अमलीपदार्थाची किंमत ६१ लाख ४ हजार रुपये असल्याचे खार पोलिसांचे म्हणणे आहे.>पांडेवर दिल्लीतही गुन्हा!पोलिसांनी अटक केलेल्या तिघांपैकी संजय पांडेवर दिल्लीमध्ये २०१२ मध्ये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल असून तो जामिनावर बाहेर होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे हे तपास करीत आहेत.