साडेसात कोटींचे एमडी हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 04:53 AM2018-04-16T04:53:49+5:302018-04-16T04:53:49+5:30
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये असलेल्या शारदा केमिकल्स या फॅक्टरीमध्ये अंबोली पोलिसांच्या ‘विशेष पथका’ने शनिवारी धाड टाकली. त्यात साडेसात कोटींहून अधिक किमतीचा द्रव स्वरूपातील ‘एमडी’ हस्तगत करण्यात आले.
मुंबई - ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये असलेल्या शारदा केमिकल्स या फॅक्टरीमध्ये अंबोली पोलिसांच्या ‘विशेष पथका’ने शनिवारी धाड टाकली. त्यात साडेसात कोटींहून अधिक किमतीचा द्रव स्वरूपातील ‘एमडी’ हस्तगत करण्यात आले. मुंबई पोलिसांनी द्रव स्वरूपात हा अमली पदार्थ हस्तगत करण्याची ही पहिली वेळ आहे. या छाप्यात पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या.
शाहिद हुसेन शेर मोहम्मद शाह (२७) आणि नारायणभाई पटेल (७४) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अंबोलीत एक इसम अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख आणि पोलीस उपनिरीक्षक दया नायक यांना १३ एप्रिलला मिळाली. त्यानंतर, त्यांनी या परिसरात सापळा रचून शाहला ३०० ग्रॅम एमडीसह चौकशीसाठी ताब्यात घेतले.
कंपनीला सील
बदलापूरमधील शारदा केमिकल्स फॅक्टरीच्या एका युनिटमध्ये एमडी बनविले जात असल्याची माहिती शाहने पोलीस चौकशीत दिली. त्यानुसार, नायक यांच्या पथकाने शनिवारी या ठिकाणी धाड टाकली आणि पटेलला ताब्यात घेतले. पटेलकडून पोलिसांनी ७५ लीटर द्रव स्वरूपातील एमडी हस्तगत केले. त्याची किंमत साडेसात कोटी आहे. या कंपनीला सील करण्यात आले. अटक आरोपींना न्यायालयाने १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे, अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ भरत गायकवाड यांनी सांगितले.