नियम मोडणाऱ्या २७६ वाहनांवर कारवाई
By admin | Published: June 26, 2015 01:39 AM2015-06-26T01:39:33+5:302015-06-26T01:39:33+5:30
विविध प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २७६ वाहनांवर आरटीओने एका विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई केली आहे. यात १९९ रिक्षा तर ३६ खासगी
नवी मुंबई : विविध प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २७६ वाहनांवर आरटीओने एका विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई केली आहे. यात १९९ रिक्षा तर ३६ खासगी बसेसचा समावेश आहे. या कारवाईसाठी पिंपरी-चिंचवड, कल्याण व पनवेल येथून विशेष तपासणी पथके पाचारण करण्यात आली होती.
वाहनधारकांकडून अनेकदा वाहतूक नियमांची पायमल्ली केली जाते. वाहनांची फिटनेस प्रमाणपत्रे, आवश्यक कागदपत्रे, वाहन चालविण्याचा परवाना, पीयूसी आदी गोष्टींची वाहनधारकांकडून पूर्तता केली जात नसल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर १५ ते २0 जून २0१५ या कालावधीत नवी मुंबई आरटीओने अशा वाहनांची झाडाझडती घेतली होती. सीवूड्स, नेरूळ, रबाळे, घणसोली, तुर्भे, वाशी आणि सानपाडा आदी ठिकाणी पथके तैनात करून ही कारवाई करण्यात आली. याअंतर्गत ४१ टॅक्सी, ११९ रिक्षा आणि ३६ खासगी बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापैकी ६ टॅक्सी, ४५ रिक्षा आणि ५ बसेसवर जप्तीची कारवाई करण्यात आली. तर १५ अवैध रिक्षा भंगारात काढण्यात आल्या आहेत. १0 वाहनचालकांचे नोंदणी व परवाने रद्द करण्यात आल्याचे आरटीओ अधिकारी संजय धायगुडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)