मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा कारवाईचा बडगा सुरूच असून, सोमवारी खार येथील तब्बल ४२ अनधिकृत बांधकामे महापालिकेने जमीनदोस्त केली आहेत.आयुक्तांच्या निर्देशानुसार ठिकठिकाणांवरील अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त करण्यात येत आहेत. वांद्रे पूर्व परिसरात करण्यात आलेल्या अतिक्रमणविरोधी धडक कारवाई पाठोपाठ, महापालिकेच्या ‘एच पूर्व’ विभागाद्वारे खार पूर्व स्थानकाजवळील जयप्रकाश मार्गावरील ४२ अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करत, ही अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली आहेत. या कारवाईमुळे खार पूर्व स्थानकाजवळील परिसर मोकळा झाला आहे, कलिना परिसरातील एअर इंडिया कॉलनी परिसरातील २ गाळे तोडून येथील साहित्य जप्त करण्यात आले आहे. याच परिसरातील ६ अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांचेही साहित्यही जप्त करण्यात आले आहे.पालिकेच्या १५ जणांच्या चमूने ही कारवाई केली, अशी माहिती ‘एच पूर्व’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली. या कारवाईदरम्यान १ डंपरसह २ अतिक्रमण निर्मूलन वाहनांचा वापर करण्यात आला. (प्रतिनिधी)
खारमधील ४२ अनधिकृत बांधकामांवर कारवाई
By admin | Published: August 23, 2016 2:00 AM