जन आरोग्य योजनेतील गरीब रुग्णांना लुबाडणाऱ्या ४५ रुग्णालयांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 01:43 AM2018-09-16T01:43:53+5:302018-09-16T07:01:19+5:30
राज्यभरात रुग्णालयांवर छापे; उपचाराचे ५० लाख रुपये रुग्णांना मिळाले परत
- योगेश बिडवई
मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेणाºया रुग्णांना लुबाडणाºया मुंबईसह राज्यातील ४५ रुग्णालयांवर राज्य सरकारने कारवाई करत गरीबांचे ५० लाख रुपये परत केले आहेत. गरीबांना लाभ न देणाºया ३२ रुग्णालयांना या योजनेतूनही काढून टाकले आहे. तर दोषी आढळलेल्या १३ रुग्णालयांमध्ये ही योजना तात्पुरती थांबविण्यात आली आहे.
राज्यातील ५०० रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत उपचार केले जातात. त्यात पांढरी शिधापत्रिकाधारक वगळता जवळपास सर्व नागरिकांना लाभ मिळतो. मात्र सामंजस्य करार केलेली अनेक रुग्णांलये गरीबांकडून पैसे उकळत असल्याचे पथकाने राज्यभर टाकलेल्या छाप्यांमध्ये आढळले आहे. अनेकांनी ग्राहक सेवा कक्षाकडे तक्रार केल्यानंतर आठवड्याच्या आत गरीबांना त्यांना पैसे परत करण्यात येत आहेत.
रायगड जिल्ह्यातील नेरेपाडा येथील मयुरी पाटील यांना श्वसनाचा त्रास झाल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करून व्हेंटिलेटरवर ठेवले होते. योजनेची व्यवस्थित माहिती नसल्याने १० दिवसांच्या उपचारांचे त्यांना २ लाख २५ हजार रुपये बिल लावण्यात आले होते. २२ आॅगस्टला आरोग्य मित्रांनी त्याची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या वरळी कार्यालयाला माहिती दिली. त्यांचा योजनेत समावेश असल्याने तीन दिवसांतच योजनेतून त्यांचे उपचार झाले व त्यांना एक रुपयाही द्यावा लागला नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील आडगाव (पिशोर) यांच्यावर हाडाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्याकडून २,३०० रुपये घेण्यात
आले होते. तेही त्यांना परत मिळाले. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील बेबीताई पाटील यांनाही उपचारांसाठी १० दिवस रुग्णालयात थांबावे लागले होते. त्यांच्याकडून ९,८५१ रुपये घेण्यात आले होते. २७ जुलैला त्यांची तक्रार आल्यानंतर ४ आॅगस्टला रुग्णालयाने त्यांचे पैसे परत केले.
गरीब रुग्णांना लुबाडणाºया आणखी काही रुग्णालयांवरही महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या पथकाने कारवाई केली आहे. यातील काही प्रकरणांची चौकशी सुरू असून, पुढील काही दिवसांत दोषी रुग्णालयांवर कारवाई होईल. डॉ. शिंदे यांच्या पथकाने १०० रुग्णालयांना रात्री-अपरात्री भेट दिली. प्रत्यक्ष रुग्णांशी संवाद साधला. त्यातून त्यांना काही ठिकाणी रुग्णांकडून पैसे घेणे, योग्य उपचार न देणे अशा प्रकारचे गैरप्रकार आढळले.
सामंजस्य करार केलेल्या रुग्णालयांकडून योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी सुरू आहे की नाही, याची काटेकोरपणे पाहणी केली जात आहे. आमची पथके रुग्णालयांना अचानक भेट देतात. ‘सर्वांसाठी आरोग्य’ या ध्येयानुसार या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा आमच्या विभागाचा प्रयत्न आहे.
- डॉ. सुधाकर शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी
योजनेतून काढलेली रुग्णालये
कोकणातील ५, पुणे ६, नाशिक ८, औरंगाबाद ५, नागपूर ५, अमरावती विभागातील ३ रुग्णालये योजनेतून काढण्यात आली आहेत.
निलंबित रुग्णालये
कोकणातील २, पुणे १, नाशिक ६, औरंगाबाद १, नागपूर २, अमरावती येथील एका रुग्णालयावर निलंबणाची कारवाई झाली आहे.