मुंबईत ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह अंतर्गत ७९८ तळीरामांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 03:17 AM2020-01-02T03:17:41+5:302020-01-02T06:55:32+5:30
गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ : ५८८ दुचाकीस्वार, २१० चारचाकी चालकांचा समावेश
मुंबई : मुंबईत ३१ डिसेंबरच्या रात्री वाहतूक पोलिसांनी ७९८ तळीरामांवर कारवाई केली आहे. गेल्या वर्षी ४३३ तळीरामांवर कारवाई करण्यात आली होती. या वर्षी तळीरामांच्या संख्येत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
मुंबई पोलिसांनी सकाळी ६ वाजेपर्यंतची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, एकूण ५ हजार ३३८ लोकांची पोलिसांनी तपासणी केली. तर, ५८८ दुचाकीस्वार, २१० कार चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईत ३४ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांनी अनेकांची वाहने जप्त केल्याने त्यांना आपली रात्र चौकशी कारवाईतच घालवावी लागली. मुंबई पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या रात्रीपासूनची तयारी संध्याकाळी ४ वाजल्यापासून केली होती. अनेक ठिकाणी चेकनाका, पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
६०० चालकांनी सिग्नल तोडला
जल्लोषात ११०० वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. यामध्ये ६०१ जणांनी सिग्नल तोडला, २५८ जणांवर ट्रिपल सीट प्रकरणी तर भरधाव वेगात वाहन चालविल्यामुळे २४१ जणांवर कारवाई करण्यात आली.
अशी झाली तपासणी
माटुंग्यात सर्वाधिक ४३८ जणांची तपासणी करण्यात आली, तर २४ जणांवर कारवाई केली. दहिसर येथे २२४ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात सर्वाधिक ५८ जणांवर कारवाई करण्यात आली. वरळीत १८३ जणांची तपासणी करून ८ जणांवर कारवाई करण्यात आली.