Join us

सात दिवसांत ८२ तृतीयपंथीयांवर कारवाई

By admin | Published: May 26, 2016 3:19 AM

लोकल, मेल-एक्स्प्रेसमधील तसेच प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांकडे तृतीयपंथीयांकडून पैसे मागितले जातात. अनेकदा बळजबरीही केली जाते. त्याविरोधात प्रवाशांकडून तक्रारी आल्यानंतर

मुंबई : लोकल, मेल-एक्स्प्रेसमधील तसेच प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांकडे तृतीयपंथीयांकडून पैसे मागितले जातात. अनेकदा बळजबरीही केली जाते. त्याविरोधात प्रवाशांकडून तक्रारी आल्यानंतर त्याची दखल घेत मध्य रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत गेल्या सात दिवसांत ८२ तृतीयपंथीयांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.गेल्या काही वर्षांत रेल्वेत तृतीयपंथीयांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात तृतीयपंथीयांकडून प्रवाशांसोबत अश्लील कृत्य करण्यात येत असल्याचे मध्य रेल्वे सुरक्षा दलाच्या निदर्शनास आले. त्यानुसार एप्रिल महिन्यात विशेष मोहीम हाती घेत विद्याविहार ते कुर्लादरम्यान १३ तृतीयपंथीयांना पकडले होते. त्यानंतर मे महिन्यात आणखी एक मोहीम घेण्याचा निर्णय रेल्वे सुरक्षा दलाकडून घेतला. या मोहिमेत मागील सात दिवसांत ८२ तृतीयपंथीयांची धरपकड करण्यात आली. यात कल्याणमध्ये सर्वात जास्त ३६ जणांना पकडण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी दिली. त्याशिवाय कुर्ला, विद्याविहार, दातिवली स्थानकातही मोठी कारवाई करतानाच लोकल तसेच मुंबईत येणाऱ्या उत्तरेतील मेल-एक्स्प्रेसमध्येही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)२0१५ मध्ये १ हजार ४00 तृतीयपंथीयांवर कारवाई करण्यात आली होती. ५६ जणांना तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली होती, तर २0१६ च्या एप्रिलपर्यंत ४९८ पेक्षा जास्त जणांवर कारवाई झाली आहे.