Join us

गणेशोत्सवात ड्रग्जची ‘लाइन’ खेचणाऱ्या २१ जणांविरुद्ध कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 7:51 AM

ड्रग्ज तस्करांबरोबर सेवन करणारेही रडारवर

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात ड्रग्ज तस्करीची लगबग करणाऱ्यांची धरपकड सुरू असतानाच गुन्हे शाखेने सेवन करणाऱ्यांविरुद्धही कारवाईचा वेग वाढला आहे. रविवारी दिवसभरात २१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांकडून विशेष मोहीम राबवून धडक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत कोट्यवधींचे चरस, एमडी अमली पदार्थविरोधी विभागाने जप्त केले आहे. याच काळात छुप्या पद्धतीने ड्रग्जचा पुरवठा तसेच तस्करी करणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा लक्ष ठेवून आहे.  दुसरीकडे, पोलिस कारवाईत अडकू नये म्हणून ही टेक्नोसॅव्ही मंडळी डार्कवेबभोवती गर्दी करताना दिसत आहे. डीप वेबमध्ये अशा सर्व प्रकारच्या वेबपेजचा समावेश आहे, जे सर्च इंजिन शोधू शकत नाही. इथे किती वेबसाइट आहेत, किती डीलर आहेत, खरेदी करणारे किती आहेत, याची माहिती मिळवणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळेच डार्क वेबवर चालणाऱ्या या कारभाराचा पसारा किती आहे, याचा अंदाज लावता येत नाही. 

ओपन इंटरनेट आणि सर्वसामान्य सर्च इंजिनवर होणाऱ्या कामांवर लक्ष ठेवणे सोपे असते; पण डार्क वेबवर लक्ष ठेवणे कठीण आहे. याच कारणांमुळे डार्क वेब बेकायदा घडामोडींचा अड्डा बनले आहे. त्यामुळे अशा पडद्याआड असलेल्या ड्रग्ज तस्कर, पुरवठादारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान यंत्रणासमोर उभे ठाकले आहेत.

टॅग्स :अमली पदार्थगुन्हेगारीमुंबई