मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. वेगाची मर्यादा ओलांडली म्हणून आतापर्यंत नवी मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाकडून २ हजार २०० चालकांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून ४ लाख ४० हजार रुपये दंड वसूल केला आहे.
अटल सेतूवर मध्येच वाहने थांबविली म्हणून १४६ वाहनांवर कारवाई केली आहे.. यामध्ये पूलावर मध्येच वाहन थांबवून सेल्फी काढण्यात येणाऱ्या कारवाईचाही तपशील आहे. पुलावर वाहन थांबवल्याप्रकरणी २ गुन्हे आणि स्थानिक खटले शिवडी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आले आहेत, असे वाहतूक पोलीनी सांगितले. अटल सेतूवर थर्मल सेन्सर कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे सेतूवर कितीही फॉग असला तरी ऑटोमॅटिक यंत्रणेच्या मदतीने हिट जनरेट होते आणि कॅमेराला वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांचे फोटो काढण्यासह वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांचे फोटो काढता येतात.
वेगाला लगाम -
१) सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने काढण्यात आलेले फोटो किंवा स्क्रीनशॉट एमएमआरडीएच्या वतीने वाहतूक पोलिसांना पाठविले जात आहेत. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करणे वाहतूक पोलिसांना आणखी सोपे होत आहे.
२) अटल सेतूवर वेगाची मर्यादा १०० निश्चित करण्यात आली आहे. एखाद्या वाहन चालकाने वेगाची ही मर्यादा ओलांडली तर त्याचे चलान कापले जाईल.