Join us

विनामास्क फिरणाऱ्या ६६६७ नागरिकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:08 AM

मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविली आहे. मात्र खबरदारी आणि सतर्कतेचा इशारा दिल्यानंतरही विनामास्क फिरणाऱ्या लोकांची ...

मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविली आहे. मात्र खबरदारी आणि सतर्कतेचा इशारा दिल्यानंतरही विनामास्क फिरणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. गेल्या महिन्यापर्यंत विनामास्क फिरणारे जेमतेम तीन हजार नागरिक सापडत होते. मात्र आता ही संख्या दुप्पट झाली आहे. मागील दीड वर्षांत ३३ लाख लोकांवर कारवाई करून ६६ कोटी ७८ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रसार मार्च २०२० पासून मुंबईत सुरू झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यास पालिकेने सुरुवात केली. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांचे प्रमाण नियंत्रणात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांचे प्रमाण पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे.

आरोग्यतज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला असल्याने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवरील कारवाई पालिकेने पुन्हा तीव्र केली आहे. मात्र मागील काही दिवसांत दररोज सरासरी साडेसहा हजार नागरिक विनामास्क फिरताना पकडले जात आहेत. यातून नागरिकांचा हलगर्जीपणा पुन्हा दिसून येऊ लागला आहे. दिवसभरात अशा ६६६७ लोकांकडून १३ लाख ३३ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

एप्रिल २०२० ते ११ सप्टेंबर २०२१

(नागरिक)....आतापर्यंत दंड

२८००७३१...५६३८०५८०० (महापालिकेमार्फत कारवाई)

४८१०५१....९६२१०२०० (मुंबई पोलिसांमार्फत कारवाई)

* एप्रिल २०२० ते ११ सप्टेंबर २०२१ पर्यंत ३३ लाख १९ हजार ५८७ लोकांवर कारवाई केली. यातून ६६ कोटी ७८ लाख ३८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

* रस्त्यावर थुंकणाऱ्या २७ हजार ७९८ लोकांना प्रत्येकी दोनशे रुपये दंड आकारण्यात आला. त्यातूनही ५६ लाख ४८ हजार ३०० रुपये वसूल करण्यात आले आहेत.

* दक्षिण मुंबईत रस्त्यांवर थुंकण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. एका दिवसात पालिकेच्या पथकाने कुलाबा ते भायखळा या भागातून २९४ लोकांना दंड करून ५८ हजार ८०० रुपये दंड वसूल केला.