विनामास्क रेल्वे प्रवास करणाऱ्या ७८०० प्रवाशांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:06 AM2021-03-01T04:06:38+5:302021-03-01T04:06:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांना १ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांना १ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सोशल डिस्टसिंग याचे पालन करणे आवश्यक आहे; परंतु अनेक प्रवासी विनामास्क लोकल प्रवास करतात. त्यामुळे, अशा प्रवाशांवर पालिका आणि रेल्वेकडून कारवाई करण्यात येत आहे. १ ते २७ फेब्रुवारीदरम्यान ७८०० प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनामास्क लोकल प्रवासासाठी मुभा नाही. लोकल प्रवाशांना नियम पाळण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले होते. मात्र, काही प्रवासी विनामास्क प्रवास करीत आहेत; त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढत आहे. विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे आणि महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार मध्य मार्गावर गेल्या २७ दिवसांत चार हजार प्रवाशांवर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर ३ हजार ८०० प्रवाशांवर कारवाई करून १४ लाख रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे.
कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यासाठी महापालिकेने कर्मचारी तैनात केले आहेत. दरम्यान, काही प्रवासी दंड न भरता बिनधास्त प्रवास करीत आहेत. काही प्रवासी दंड भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्याचे स्वरूप नंतर भांडणात होते; त्यामुळे अखेर स्थानकावरील रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी येऊन कारवाई करीत आहेत.