मुंबई : १२ आँक्टोबर रोजी मुंबईतील बत्ती गुल होण्यास जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महापारेषणच्या वाशी परिमंडळातील ४ अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, त्यापैकी एक अधिकारी त्या दिवशी सुट्टीवर होता. तर, दुस-याची ड्यूटी तीन तास आधी संपली होती. अन्य दोघांचाही कोणताही दोष नसताना त्यांना बळीचा बकरा करण्यात आल्याचा सूर अभियंत्यांच्या संघटनानी आळवला आहे. निलंबन मागे घेण्यासाठी ऊर्जा मंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही न्याय मिळत नसल्याने तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसण्याची तयारीसुध्दा सुरू झाली आहे.
टाटाची आयलँण्डीग यंत्रणा फेल झाल्यामुळे १२ आँक्टोबर रोजी भर दिवसा मुंबई अंधारत बुडाली होती. या तांत्रिक बिघाडाची चौकशी करण्यासाठी तीन स्वतंत्र समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच महापारेषणच्या वाशी परिमंडळातील चार अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. परंतु, यापैकी एक अधिकारी त्या दिवशी सुट्टीवर होते. दुस-या अधिका-याची ड्यटी तीन तास आधी संपली होती. ४०० केव्ही यंत्रणंच्या कामाचा भार सांभाळण्यासाठी एक अतिरिक्त कायर्कारी अधिका-याच्या नेतृत्वाखाली एक आर्टीझन आणि एक हेल्पर कार्यरत ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, त्या दिवशी एक अधिकारी आणि आऊटसोर्स केलेल्या टेक्निशनच्या भरवशावर काम केले जात होते. वरिष्ठ कर्मचा-यांची गैरहजेरी, पुरेशा कर्मचा-यांची वानवा, कालबाह्य यंत्रणा, दुरूस्तीकडे दुर्लक्ष अशा असंख्य अडचणी असताना कामावर योग्य पद्धतीने नियंत्रण ठेवणार कसे असा सव्ला अधिका-यांकडून उपस्थित केला जात आहे. केंद्रातील या तांत्रिक त्रृटींच्या विरोधात सातत्याने प्रशासनाला अवगत केले जात होते. मात्र, अधिका-यांची आश्वासनांवर बोळवण केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तब्बल ५५ टक्के पदे रिक्त
वाशी परिमंडळात कर्मचा-यांची एकूण २३०६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ १०४९ पदे भरण्यात आली असून तब्बल ५५ टक्के पदे रिक्त आहेत. आँगस्ट महिन्यांत कंपनीने २३ अभियंत्यांच्या बदल्य परिमंडळाबाहेर केल्या. त्यामुळे कर्मचा-यांवर कामाचा प्रचंड ताण प्रचंड वाढला आहे. अनेकांना साप्ताहिक सुट्टीसुध्दा घेणे शक्य होत नसून त्याचे विपरीत परिणाम त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यावर होत आहे. त्यामुळे १७० कर्मचा-यांनी वाशी परिमंडळाबाहेर बदली करण्यासाठी विनंती अर्ज केल्याची माहिती हाती आली आहे.