Join us

रक्तसाठा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रक्तपेढ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:09 AM

मुंबई : राज्यात रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा असूनही देण्यास टाळाटाळ कऱणाऱ्या पेढ्यांवर राज्य रक्त संक्रमण परिषेदच्यावतीने कारवाई करण्यात येणार आहे. रक्त ...

मुंबई : राज्यात रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा असूनही देण्यास टाळाटाळ कऱणाऱ्या पेढ्यांवर राज्य रक्त संक्रमण परिषेदच्यावतीने कारवाई करण्यात येणार आहे. रक्त देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि रक्तसाठ्याची माहिती अद्ययावत न करणाऱ्या राज्यातील २३४ रक्तपेढ्यांवर राज्य रक्त संक्रमण परिषदेने कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी हजार रुपये दंडवसुली करण्यात आली आहे. यापुढे देखील वारंवार सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाकडून रक्तपेढीचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.

राज्यभरात ३१२ रक्तपेढ्या आहेत. तर मुंबईत ५३ रक्तपेढ्या आहेत. जानेवारीपासून बेशिस्त रक्तपेढ्यांवरील कारवाईला सुरुवात झाली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात ही कारवाई करण्यात आली आहे. दर महिन्यात १२० हून अधिक रक्तपेढ्यांच्या तक्रारी येत आहेत. सध्या मे ते जुलै महिन्यात आलेल्या रक्तपेढ्यांच्या तक्रारी विचारात घेत त्या रक्तपेढ्यांना बाजू मांडण्याची संधी दिली जात आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास मार्चपूर्वीच रक्तपेढ्यांवर कारवाईचा इशारा दिला गेला. त्यानंतर राज्यातील अनेक रक्तपेढ्यांनी आता माहिती अद्ययावत करण्यास सुरुवात केली आहे. मात्र तरी देखील काही रक्तपेढ्या रक्तसंकलनाची माहिती भरण्यास टाळाटाळ करत आहेत. तर काही रक्तपेढ्या रक्त देण्यास टाळाटाळ करत असल्याचे समोर आले.

राज्यातील रक्तपेढ्यांना वारंवार सूचना करून नियम पाळत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता संक्रमण परिषदेने कारवाई व दंडात्मक पवित्रा आकारण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषेदेचे डॉ. अरुण थोरात यांनी दिली आहे.