मुंबई : अल्पवयीन मुलांकडून मेहनतीचे काम करून घेणाऱ्या मालकावर वनराई पोलिसांनी कारवाई केली आहे. यातून १० आणि १२ वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली आहे.
एका सामाजिक संस्थेच्या सतर्कतेमुळे या मुलांची सुटका झाली आहे. १८ फेब्रुवारी रोजी एका बांगडीच्या कारखान्यामध्ये बालकामगार काम करीत असल्याची माहिती मिळताच, त्यांनी याबाबत वनराई पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला. तेथे काम करत असलेल्या ८ ते १० जणांमध्ये दोन अल्पवयीन मुले काम करताना आढळून आले. यात एक मुलगा नेपाळ, तर दुसरा मुलगा उत्तर प्रदेशातील होता. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत कारखाना चालक सिराज अहमद अब्दुल रौफ (वय ३६) हा मुलांकड़ून जबरीने शारीरिक श्रमाचे काम करून घेत होता. त्याचा योग्य मोबदलाही देत नसे शिवाय त्यांना सुट्टीही देत नसल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत पथकाने अधिक तपास सुरू केला आहे.