कंगनावरील कारवाई कायदेशीरदृष्ट्या योग्यच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:08 AM2021-09-10T04:08:33+5:302021-09-10T04:08:33+5:30
उच्च न्यायालयाचा निर्वाळा : जावेद अख्तर मानहानीप्रकरणी दिलासा देण्यास नकार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रसिद्ध गीतकार व लेखक ...
उच्च न्यायालयाचा निर्वाळा : जावेद अख्तर मानहानीप्रकरणी दिलासा देण्यास नकार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रसिद्ध गीतकार व लेखक जावेद अख्तर यांनी केलेल्या मानहानी दाव्याप्रकरणी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने केलेली कारवाई कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे, असा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिला दणका दिला आहे. या निर्णयामुळे कंगनाला दंडाधिकारी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. कंगनाच्या याचिकेवर सुनावणी घेणाऱ्या न्या. रेवती मोहिते-ढेरे यांनी याचिका फेटाळण्यात येत आहे, असे म्हटले.
दंडाधिकारी न्यायालयाने सारासार विचार न करता ही कारवाई सुरू केली, असा दावा कंगना हिने ॲड. रिझवान सिद्दिकी यांच्याद्वारे उच्च न्यायालयात केला. तिच्याविरोधात तक्रार केलेल्या तक्रारदाराची (जावेद अख्तर) व साक्षीदारांची स्वतंत्रपणे छाननी केली आहे. केवळ जुहू पोलिसांच्या अहवालावरून दंडाधिकाऱ्यांनी कारवाई केली, असे कंगना हिने याचिकेत म्हटले आहे. जावेद अख्तर दाव्यासंदर्भात पोलिसांनी केलेली चौकशी एकतर्फी आहे. माझ्या साक्षीदारांना कधीच बोलावण्यात आले नाही. कोणत्याही पक्षाची छळवणूक होणार नाही, याची खात्री करण्याचे काम दंडाधिकाऱ्यांचे आहे, असे कंगनातर्फे रिझवान सिद्दिकी यांनी न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या एकलपीठाला सांगितले.
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. अर्णब गोस्वामी यांना दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्यावर तथ्यहीन आरोप करून बदनामी केली, असे अख्तर यांनी तक्रारीत म्हटले आहे.
डिसेंबर २०२०मध्ये दंडाधिकाऱ्यांनी जुहू पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, पोलिसांनी चौकशी अहवाल सादर करत अख्तर यांनी केलेल्या दाव्यात सकृतदर्शनी तथ्य असल्याचे म्हटले. त्या अहवालाच्या आधारे दंडाधिकाऱ्यांनी कंगना हिच्यावर फौजदारी कारवाईस सुरुवात करत तिला समन्स बजावले. या कारवाईला कंगनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.