Join us

भूमाफियांवरील कारवाई नाममात्रच

By admin | Published: February 02, 2016 2:21 AM

चारकोप परिसरातील तिवरांची कत्तल, जाळण्याचे प्रकार प्रसिद्धिमाध्यमांनी वारंवार उघडकीस आणूनही महापालिका आणि पोलीस यंत्रणा केवळ नाममात्र कारवाई करून भूमाफियांना अभय देत

मुंबई : चारकोप परिसरातील तिवरांची कत्तल, जाळण्याचे प्रकार प्रसिद्धिमाध्यमांनी वारंवार उघडकीस आणूनही महापालिका आणि पोलीस यंत्रणा केवळ नाममात्र कारवाई करून भूमाफियांना अभय देत असल्याबाबत नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.चारकोप पोलीस ठाण्यापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावरील लक्ष्मीनगर परिसरात भूमाफियांनी अतिक्रमण करीत हैदोस घातला आहे. तिवरांची कत्तल करून त्या ठिकाणी भरणी केली जात आहे. या जागेत खोल्या, गॅरेज, चाळी उभारल्या जात आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे एका राजकीय पक्षाचे कार्यालयही भरणी केलेल्या जागेत उभारण्यात आले आहे. राजरोसपणे हे अतिक्रमण होत असताना पोलीस आणि पालिका विभाग कार्यालय याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अखेर युनायटेड असोसिएशन फॉर सोशल, एज्युकेशनल अ‍ॅण्ड पब्लिक वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष रेजी अब्राहम आणि कार्यकर्त्यांनी या अतिक्रमणाची छायाचित्रे काढून ती महापालिका आणि पोलिसांना सादर केली. या प्रकरणातील भूमाफियांची माहितीही या निवेदनाद्वारे सादर करण्यात आली. तरीही कारवाई करण्यात संबंधित यंत्रणा टाळाटाळ करीत होत्या. यावर प्रसिद्धिमाध्यमांनी प्रकाश टाकल्यानंतर महापालिकेने दोन वेळा येथील अनधिकृत बांधकामे पाडण्याची नाममात्र कारवाई केली आणि त्यानंतर पोलीस बंदोबस्त उपलब्ध होत नसल्याचे निमित्त पुढे करीत महापालिकेने कारवाई थांबवल्याचे रेजी अब्राहम यांनी सांगितले. विशेष म्हणजे तिवरांच्या जागेतील अतिक्रमण हटवले तरी ते उभारणाऱ्या भूमाफियांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली नसल्याकडे अब्राहम यांनी लक्ष वेधले. राजकीय हितसंबंधांमुळे ही कारवाई टाळण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)