मुंबईत गेल्या तीन दिवसांत वाहतूक विभागाकडून २४६० वाहनांवर पीयूसीचे नियम न पाळल्याबाबतची कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रणासाठीच्या अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर वाहनांमुळे होणारं प्रदूषणाच्या मुद्द्यावरुन वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
मुंबईतील दुचाकी, चारचाकी आणि जड वाहन धारकांवर पीयूसी प्रमाणपत्राचे नूतनीकरण न केल्याबद्दल वाहतूक विभागाकडून कडक कारवाई केली जात आहे. यात वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या ४४९ वाहनांवर कारवाई केली गेली. तर १९५ वाहनांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय बांधकाम साहित्य आणि डेब्रिजची ने-आण व्यवस्थित न केल्याबद्दल १ हजारहून अधिक वाहनांवर कारवाई केली गेली आहे.
वायू प्रदूषणात भर ठरण्यास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश वाहतूक पोलीस सहाय्यक आयुक्त प्रवीण पडवळ यांनी वाहतूक पोलिसांना दिले आहेत. पीयूसी नूतनीकरण न करणाऱ्या वाहनांविरोधात केंद्रीय मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई केली जात आहे. बांधकाम साहित्य तसंच रेडीमिक्स काँक्रिट हे वाहनांतून नेताना ते पूर्णपणे झाकलेलं असेल याची काळजी घेण्यात यावी, असं आवाहन पडवळ यांनी केलं आहे.