‘नवाब मलिकांवरील कारवाई हे केंद्रीय यंत्रणेच्या गैरवापराचं उदाहरण’, शरद पवार यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 11:04 AM2022-02-23T11:04:34+5:302022-02-23T11:05:52+5:30
Nawab Malik News: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने केलेल्या कारवाईविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नवाब मलिकांवरील कारवाई हे केंद्रीय यंत्रणेच्या गैरवापराचं उदाहरण असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
मुंबई - राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात नेले आहे. तिथे सकाळपासून त्यांची चौकशी सुरू आहे. भल्या पहाटे ईडीने नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नवाब मलिकांवरील कारवाई हे केंद्रीय यंत्रणेच्या गैरवापराचं उदाहरण असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, याबाबत काय बोलायचं? यात काही नवीन नाही. सध्या ज्या प्रकारे यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे त्याचं हे एक उदाहरण आहे. आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे कधीतरी घडेल. नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात. त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही.
मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे साडेचारच्या सुमारास ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या निवासस्थानी आले. तेव्हा त्यांच्यासोबत सीआरपीएफचे जवान होते. मलिक यांना कारवाईची कल्पना दिल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी साडेसात वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात आणले. त्यानंतर सकाळी पावणेआठ वाजल्यापासून मलिक यांची चौकशी सुरू आहे.