Join us

तक्रार न घेणाऱ्या पोलिसावर कारवाई

By admin | Published: April 10, 2016 3:21 AM

कालिना येथे एका तरुणीला झालेली मारहाण आणि विनयभंगप्रकरणी तक्रार दाखल करून घेण्यात दिरंगाई करणे वाकोला पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांना भोवले आहे.

मुंबई : कालिना येथे एका तरुणीला झालेली मारहाण आणि विनयभंगप्रकरणी तक्रार दाखल करून घेण्यात दिरंगाई करणे वाकोला पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांना भोवले आहे. या प्रकरणी प्राथमिक चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या पवार यांची वेतनवाढ एक वर्षासाठी रोखण्यात आली आहे. कालिना परिसरात राहणाऱ्या एका मेकअप आर्टिस्ट तरुणीला २७ फेबु्रवारी रोजी रवी जाधव (२७) नावाच्या तरुणाने मारहाण करत तिचा विनयभंग केला होता. त्याबाबत ती पोलिसांकडे तक्रार देण्यास गेली असता तत्कालीन ड्युटी अधिकारी पवार यांनी निव्वळ अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल करून तिला परत पाठविले होते. हे प्रकरण वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर या प्रकरणी मारहाण आणि विनयभंगाची एफआयआर दाखल करून घेण्यात आली आणि जाधवला अटक करण्यात आले. सहायक निरीक्षक यांच्या हलगर्जीपणाबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सहायक आयुक्तांनी संबंधितांचे जबाब घेऊन अहवाल वरिष्ठांकडे सादर केला. पवार यांनी तरुणीची भाषा समजत नसल्याने तिचा विनयभंगदेखील झाला, ही बाब मला समजली नाही, असा जबाब दिला होता. दरम्यान, मी पवार यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे समाधानी आहे. मात्र माझ्यावर हल्ला करणाऱ्या इसमाला कडक शिक्षा व्हावी, अशी माझी इच्छा आहे जेणेकरून त्याने पुन्हा असा काही प्रकार अन्य कोणासोबत करू नये, असे या प्रकरणातील पीडित तरुणीने ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)