वीज चोरांविरुद्ध कारवाई; वीजचोरीची ४८८ प्रकरणे उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 08:49 AM2021-10-17T08:49:28+5:302021-10-17T08:49:40+5:30
महावितरणच्या भांडूप परिमंडलात वीजचोरांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू
मुंबई : महावितरणच्या भांडूप परिमंडलात वीजचोरांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू आहे. परिमंडळात ही मोहीम सतत सुरू असते. परंतु, मागील आठवड्यात १ ऑक्टोबरपासून ७ ऑक्टोबरपर्यंत भांडूप परिमंडळाने विशेष वीजचोरी शोधमोहिम राबवून ७ दिवसात ४८८ वीजचोरी प्रकरणे उघडकीस आणली आहेत.
३० सप्टेंबर रोजी भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी आढावा बैठक घेतली. वीज चोरी शोधमोहिम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार वीजबिलाची थकबाकी असलेल्या तसेच यापूर्वी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांच्या वीज जोडणीची तपासणी करण्यासाठी १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान वीजचोरांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली.
मुख्य अभियंता सुरेश गणेशकर व वाशी मंडलाचे अधीक्षक अभियंता राजाराम माने यांनी नियोजन करून भांडूप नागरी परिमंडलातील इतर विभागीय कार्यालयात कार्यरत असणारे अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांची नेमणूक करून ८ पथके या विशेष मोहिमेसाठी स्थापन केली. मोहीम राबविण्यासाठी मार्गदर्शन केले.
सदर कारवाईमध्ये तपासलेल्या वीजजोडणीतून विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये ४१६ ग्राहकांकडून ३०,१२,२३३ युनिट्सची ४१.१२ लाखाची वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. तर विद्युत कायदा २००३ च्या कलम १२६ अन्वये ७२ ठिकाणी वीजग्राहक दुसरीकडून वीज घेत असल्याचे आढळून आले. त्यांनी ३.२२ लाखाची वीज इतरांकडून वापरली आहे.
या ग्राहकांवर कारवाई सुरू असून वीजबिलासोबत दंडाची रक्कम न भरणाऱ्या ग्राहकांवर विद्युत कायदा २००३ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात येईल. या मोहिमेत कार्यकारी अभियंते देवेंद्र उंबरकर, मदन सांगळे, कार्यकारी अभियंता वाशी विभाग श्यामकांत बोरसे यांच्या सोबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता व इतर कर्मचाऱ्यांनी ही वीजचोरी उघडकीस आणण्यात यश मिळविले आहे.
वीजचोरी समाजासाठी कॅन्सर, त्याला काढून टाकण्याची गरज- गणेशकर
भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले, वीजचोरी हा समाजासाठी एक कॅन्सर असून याला काढून बाहेर फेकण्याची गरज आहे. वीज क्षेत्राची सध्याची स्थिती अत्यंत भयानक असून यासारख्या वीजचोरांना महावितरण सोडणार नाही. त्यांच्या या कृत्यामुळे इतर प्रामाणिक ग्राहकांसोबतच खूप नुकसान होत आहे.
महावितरणच्या भांडूप परिमंडलाने वीजचोरांविरुद्ध कंबर कसली आहे. यापुढेही वीजचोरांविरुद्ध कठोर कारवाई होईल. तरी सर्व ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी वेळेवर विजेचे बिल भरून महावितरणला सहकार्य करावे.
सध्या भरपूर प्रमाणात मीटर उपलब्ध असून तात्काळ नवीन वीजजोडणी देण्याचा सूचना सुद्धा पारित केलेल्या असून ज्या ग्राहकाचा वीजपुरवठा थकबाकीसाठी तात्पुरता / कायमस्वरूपी खंडित केला आहे. त्यांना सुद्धा पूर्ण वीजबिल भरून स्वतःचे वीज कनेक्शन चालू करण्यासठी भांडूप नागरी परिमंडलतर्फे आवाहन करण्यात आले आहे.