मुंबई- मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात उपस्थित राहून आज एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपाचे नेते किरीट सोमय्या देखील आले होते. एकनाथ शिंदे आणि किरीट सोमय्या यांच्यात काहीवेळ बातचीत देखील झाली. यानंतर किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकार बदललं, मात्र तरीही मी माझ्या तक्रारी मागे घेणार नाही, असं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र माफिया मुक्त करण्याचा मागील अडीच वर्षांपासून आमचा संघर्ष सुरु होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपाने तो पूर्ण झाला. याबद्दल मी एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी आज मंत्रालयात आलो होतो, असं किरीट सोमय्या म्हणाले. तसेच शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या दापोलीमधील रिसॉर्टविरोधातील कारवाई राज्य सरकारने सुरु ठेवावी, अशी विनंती मी एकनाथ शिंदे यांना केल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी यावेळी दिली.
नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात विशेष सजावट करण्यात आली होती. तसेच विशेष पूजा करून एकनाथ शिंदे पदभार स्वीकारतील. दरम्यान, आपल्या दालनात बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो लावत एकनाथ शिंदे यांनी आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, जून महिन्याच्या उत्तरार्धात राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेतून गेले होते. तर भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ३० जून रोजी झालेल्या शपथविधीनंतर एकनाथ शिंदे यांनी ४ जुलै रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध केले होते.