लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्नाबद्दल प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याचा ठपका ठेवत मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यार्थी वसतिगृहाच्या अधीक्षकांनी पदव्युत्तरच्या (एम.ए) एका विद्यार्थ्याला थेट शिस्तभंगाची नोटीस पाठविली. या विद्यार्थ्याने प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत असल्याचे वसतिगृह प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रसारमाध्यमांकडे तक्रार केली म्हणून एखाद्या विद्यार्थ्यावर कारवाईचा बगडा उगारण्याची ही गेल्या काही वर्षांतील मुंबई विद्यापीठातील दुर्मीळ घटना आहे.
प्रसारमाध्यमांमध्येच नव्हे तर वसतिगृहाच्या अधीक्षकांच्या परवानगीशिवाय पोलिसांशीही बोलण्यास मनाई आहे. तसेच कुलगुरु, प्र-कुलगुरुंकडेही तक्रार करण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना नाही. या नियमांची आठवण अधीक्षकांनी अर्थशास्त्राच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या सिद्धांत शिंदे या विद्यार्थ्याला लेखी बजावलेल्या नोटिशीत करून दिली आहे.
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केली, याला पुरावा काय, अशी विचारणा सिद्धांत याने केली आहे. तसेच, मीडिया, पोलिसांशी आम्ही बोलायचे नाही किंवा थेट कुलगुरु, प्रकुलगुरु यांच्याकडे तक्रार करायची नाही, हे नियमच अत्यंत अतार्किक आहेत. हे नियम कशाच्या आधारे बनवले, असा प्रश्न त्याने केला आहे.
एका विद्यार्थ्याच्या खिचडीत सोमवारी माशी आढळून आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. विद्यार्थ्यांनी याबाबत विद्यापीठाच्या अधीक्षकांकडे लेखी, ई-मेलद्वारे तक्रारी केल्या आहेत. त्यानंतरही परिस्थितीत फरक न पडल्याने पालिका, एफडीए आदी यंत्रणांकडे तर तक्रार करण्यात आली होती.
वसतिगृहाचे नियम ११ आणि १२ काय?
- वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना पोलिस किंवा मीडियाशी बोलण्याची परवानगी नाही. नियमानुसार त्यांना हॉस्टेलच्या परिसरात आणता येत नाही.
- कुठल्याही विद्यार्थ्याला थेट कुलगुरुंची, प्र-कुलगुरु, रजिस्ट्रार आणि पोलिसांकडे तक्रार करता येणार नाही. तक्रार असल्यास ती अधीक्षकांकडेच करावी.
एफडीएच्या अहवालाचे काय?
- एफडीएच्या टीमने महिनाभरापूर्वी येथील कॅन्टीनला भेट देत तयार भाज्या, डाळ, अंडा बिर्याणीचे नमुने ताब्यात घेतले होते. या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार होती. हे अन्नपदार्थ फूड सेफ्टी ॲण्ड स्टॅण्डर्ड्स अक्ट, २००६ नुसार आहेत, हे तपासले जाणार होते. मात्र हा अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे.
- विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा का उगारण्यात येत आहे. याबाबत वसतिगृहाचे अधीक्षक संतोष गिते यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या कारवाईचे समर्थन केले. कलिना संकुलात सध्या हे एकमेव कॅन्टीन सुरू आहे. या आणि इतर वसतिगृहातील विद्यार्थीच नव्हे तर विद्यापीठाचे कर्मचारीही या कॅन्टीनवर अवलंबून आहेत. त्यांची कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या जेवणाबद्दल तक्रार नाही. एकच विद्यार्थी सतत तक्रार करत असतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.