सोशल मीडियाद्वारे PIO ला प्रतिबंधित क्षेत्राची माहिती दिल्याने संशयितांवर कारवाई
By मनीषा म्हात्रे | Published: December 13, 2023 08:11 PM2023-12-13T20:11:45+5:302023-12-13T20:12:00+5:30
भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील गोपनीय माहिती वेळोवेळी पुरविली असल्याचे तसेच नमूद PIO कडून ऑनलाईन पैसे स्वीकारल्याचे निष्पन्न झाले.
दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की, एक भारतीय संशयित इसम हा Pakistan based Intelligence Operative (PIO) यांच्या संपर्कामध्ये असून त्याने भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती PIO ला पुरविली आहे.
दहशतवाद विरोधी पथकाकडून नमूद संशयित इसमाची चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान असे दिसून आले की, सदर संशयित इसमाची एप्रिल / मे २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत फेसबुक व वॉट्सअॅपद्वारे दोन PIO शी ओळख झाली होती. सदर संशयित इसमाने नमूद PIO शी फेसबुक व वॉटसअॅपवर चॅटींग करुन त्यांना भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रातील गोपनीय माहिती वेळोवेळी पुरविली असल्याचे तसेच नमूद PIO कडून ऑनलाईन पैसे स्वीकारल्याचे निष्पन्न झाले.
सदर प्रकरणी संशयीत इसम व त्याच्या संपर्कातील इतर ०३ व्यक्ती अशा एकूण ०४ इसमांविरूद्ध दहशतवाद विरोधी पथक पो. ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात संशयित इसमास अटक करण्यात आली असून दहशतवाद विरोधी पथकाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.