पालघर : माहीमच्या पाणेरी खाडी प्रदूषित होण्यास जबाबदार असणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री विष्णू सवरा यांनी रविवारी दिले.प्रदूषणाचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत असताना पाणेरी बचाव संघर्ष समितीद्वारे तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण केल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सहा कंपन्यांना क्लोझर नोटशी बजावल्या होत्या. परंतु अल्प दंड भरून या कंपन्या पुन्हा प्रदूषण करणयास मोकळ्या झाल्याचे वास्तव आज पालकमंत्री विष्णू सावरा यांच्या समोर मांडल्यानंतर त्यांनी तत्काळ प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले. पालघर शहरातील माहीम बागायती क्षेत्रातून वाहत जात पाणेरी खाडी थेट वडराई समुद्राला मिळते. २०-२५ वर्षापूर्वी याच खाडीच्या पाण्यावर परिसरातील स्थानिक आपला बागायती क्षेत्रातून भाजीपाला पिकवित होते. तर कोळीबांधव मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. परंतु पालघर एमआयडीसी निर्माण झाल्यानंतर काही रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांनी कुठलीही प्रक्रिया न करता प्रदूषित आपले प्रदूषित पाणी पाणेरी खाडीत सोडण्यास सुरुवात केल्याने ती काळी-पिवळी बनली आहे. त्यातच पालघरचे डे्रनेज पालिका पाणेरीमध्ये सोडू लागली. त्यामुळे बागयती क्षेत्र उद्धवस्त झाले. मासेमारी संपली परिसरात पाड्यात राहणाऱ्या नागरिकांना अनेक जीवघेण्या आजारोन ग्रासले. पाणेरी खाडीला प्रदूषणमुक्त करणसाठी पाणेरी संघर्ष समिती मागील २० वर्षापासून लढा देत आहे. पाणेरी खाडी प्रदूषण मुक्त करण्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आल्यानंतरही राजकीय वरदहस्तामुळे रासायनिक कारखान्यातून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी बंद होत नसल्याने पाणेरी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश म्हात्रे यांनी २४ फेब्रुवारी २०१४ रोजी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केल्यानंतर प्रदूषण मंडळाचे अधिकारी, तहसीलदार इ. नी उपोषणकर्त्यांची भेट घेत कारवाईचे ठोस आश्वासन दिले व पालघर सिडको औद्योगिक वसाहतीमधील १) हिंदुस्तान लॅबोरेटरी, अल्पाळी २) रेनुमेद फार्मास्युटीकल लॅब, अल्पाळी, ३) विपुल डायकेम लिमिटेड, अल्पाळी ४) मे. एक्सल फार्मास्युटीकल , अल्पाळी ५) पालघर कॉईल प्रॉडक्ट प्रा. लि.६) मे. रेडियम प्रिंट या सहा कंपन्यांना क्लोझर डायरेक्शन नोटीसी बजावल्या होत्या. परंतु या कारवाईमध्ये २५-३० हजाराच्या दंड भरून कंपन्या पुन्हा प्रदूषण करायला मोकळ्या झाल्याचे दिसत होते. पाणेरी बचाव समितीच्या वतीने निलेश म्हात्रे व त्याचे सहकारी मंत्रालयीन पातळीवर लढा देत असून राजकीय वरदहस्त लाभलेल्या व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असलेल्या या कंपन्या कुणालाही जुमानत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाणेरी खाडीसह वडराई, सातपाटी, मुरबे नवापूर, दांडी इ. किनारपटीवरील खाड्यामधील प्रदूषण वाढत आहे. (प्रतिनिधी)
त्या कंपन्यांविरुद्ध कारवाई - सवरा
By admin | Published: April 05, 2015 10:51 PM