विनामास्क फिरणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:24 AM2020-12-14T04:24:12+5:302020-12-14T04:24:12+5:30
नियम सर्वांना सारखा; ठोठावला प्रत्येकी २०० रुपयांचा दंड लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर मुंबई महापालिका दंडात्मक ...
नियम सर्वांना सारखा; ठोठावला प्रत्येकी २०० रुपयांचा दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर मुंबई महापालिका दंडात्मक कारवाई करत असून, या कारवाईच्या फेऱ्यातून महापालिकेचा कर्मचारी वर्गदेखील सुटलेला नाही. ऑनड्युटी विनामास्क फिरणाऱ्या मुंबई महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २०० रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला.
विनामास्क ऑनड्युटी असलेले हे कर्मचारी कामादरम्यान नागरिकांशी संवादही साधत होते. या कारवाईने मुंंबई महापालिकेने आमच्यासाठी सर्व नागरिक समान आहेत, त्यामुळे कोरोनाला हरविण्यासाठी सर्वांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे, असा संदेश दिला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जनजागृतीनंतरही काही मुंबईकर नियमांचे उल्लंघन करत असल्याने अखेर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विनामास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले. रेल्वे स्थानकांबाहेर, बसथांबा, बाजारपेठ अशा सार्वजनिक ठिकाणी पालिकेचा पहारा आहे. याअंतर्गत जी-नॉर्थमधील म्हणजे धारावी, दादर आणि माहीम परिसराशी निगडित असलेल्या कार्यालयात विनामास्क कार्यरत तीन अधिकाऱ्यांना प्रत्येकी २०० रुपये दंड ठोठाविण्यात आला. सीएफसीमधील हे कर्मचारी आहेत. समाज माध्यमांद्वारे याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
..........................