मुंबई : विनामास्क वावरणा-या नागरिकांवर मुंबई महापालिका वेगाने कारवाई करत असून, या कारवाईच्या फे-यातून महापालिकेचा कर्मचारी वर्गदेखील सुटलेला नाही. विनामास्क आढळलेल्या मुंबई महापालिकेच्या तीन कर्मचा-यांनाच दंड ठोठाविण्यात आला असून, हे कर्मचारी ऑनडयुटी होते. शिवाय कामादरम्यान नागरिकांशी संवादही साधत होते. या कारवाईने मुंंबई महापालिकेसमोर सर्व समान आहेत. त्यामुळे कोरोनाला हरविण्यासाठी नागरिकांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे, असा संदेश नागरिकांंमध्ये गेला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनामास्क नागरिकांवर पालिकेने कारवाई वेगाने सुरु केली आहे. जी-नॉर्थमधील म्हणजे धारावी, दादर आणि माहीम परिसराशी निगडीत असलेल्या कार्यालयात विनामास्क कार्यरत तीन अधिका-यांना प्रत्येकी २०० रुपये दंड ठोठाविण्यात आला आहे. सीएफसीमधील हे कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे समाज माध्यमांद्वारे याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोना स्थिती नियंत्रणात येत असली तरी भविष्याचा विचार करत महापालिकेने उल्लेखनीय पाऊले उचलत त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी, घराबाहेर विनामास्क वावरणा-या नागरिकांना दंड आकारण्यासाठी क्लीन अप मार्शल नियुक्त केले आहेत.
मुंबई महापालिकेचे पथक देखील कारवाईसाठी कार्यरत आहे. पथकात पर्यवेक्षक, कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, उपद्रव शोधक याच बरोबर विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. कोरोना रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आणि जरुरीचे आहे हे पटूवन दिले जात आहे. यासाठी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विना मास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते. रेल्वे स्थानकांबाहेर, बस थांबा, बाजारपेठ अशा सार्वजनिक ठिकाणी पालिकेचा पहारा आहे.