Join us

अर्णब गोस्वामींवर हाेणार कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:07 AM

गृहमंत्र्यांचे संकेत : अटक करण्याची काँग्रेसची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोपनीय असलेली माहिती उपलब्ध ...

गृहमंत्र्यांचे संकेत : अटक करण्याची काँग्रेसची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोपनीय असलेली माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी दिली.

अर्णब गोस्वामी व बार्कचे माजी मुख्य अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्याने त्याविरुद्ध समाजमाध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी गोस्वामी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गृहमंत्री देशमुख यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांनी उपरोक्त आश्वासन दिले.

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामी यांना घटनेच्या तीन दिवस आधीच होती, असे या संभाषणातून स्पष्ट होते. संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून लष्करी कारवाईसंदर्भातील माहिती बाहेर कशी आली, ती गोस्वामी यांना कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी कशी मिळाली, या सर्व प्रकारणाची चौकशी होणे गरजेचे आहे. गोस्वामी यांचे कृत्य गोपनीयतेचा कायदा भंग करणारे आहे. त्यावर कारवाईचे अधिकार राज्य सरकारला आहेत. त्यामुळे त्याला अटक करावी, त्यांच्या रिपब्लिक टीव्हीने अनेक बेकायदा कृत्य केली असून दूरदर्शनची सॅटेलाईट फ्रिक्ोन्शी बेकायदा वापरून प्रसार भारतीचे काेट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सावंत यांनी केली.

शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, गजानन देसाई, विनय खामकर आदी होते.