Join us

काळ्या काचांवरील कारवाई थंडावली

By admin | Published: July 03, 2014 2:41 AM

वाहनांच्या काळ्या काचांवरील कारवाई करण्यात वाहतूक पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा दुजाभाव करत असल्याने डोंबिवलीकर वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

ठाणे : वाहनांच्या काळ्या काचांवरील कारवाई करण्यात वाहतूक पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा दुजाभाव करत असल्याने डोंबिवलीकर वाहनचालक त्रस्त झाले आहेत. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय असे असतानाच त्या यंत्रणेला हुक्की आली की ते कार्यरत असताना दिसतात. सध्या तर अशी कारवाई बंदच झाल्याचे शहरात दिसून येत आहे. त्यामुळे ही कारवाई असते की केवळ फार्स, असा सवाल वाहनचालकांनी केला असून त्यांनी या दुटप्पी धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.डोंबिवलीतील दक्ष नागरिक म्हात्रे यांनीही टीका करत अनेक गाड्यांच्या काचांवर अजूनही काळी फिल्म असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. एकीकडे सर्वांना समान न्याय असावा असे सुरक्षा यंत्रणेचे धोरण असताना त्याची अंमलबजावणी केली जाते की नाही हे कोणी तपासायचे, असेही त्यांचे म्हणणे असून त्यांनी सोमवारी डोंबिवली शहर साहाय्यक पोलीस उपायुक्तांना टार्गेट करून हा सवाल केला. या ठिकाणच्या टाटा पॉवर लाइन, मानपाडा, कल्याण-शीळ रोड, नांदिवली आदी परिसरात पोलीस कारवाई करताना आढळून येत होते, मात्र गेल्या काही महिन्यांपासून ही कारवाई थंडावल्याचे ते सांगतात. पोलिसांना याबाबत विचारणा केली असता, उपलब्ध पोलीस यंत्रणेत ही कारवाई करण्यात येत असते. त्यामुळे काही वाहने नजर चुकवून निघून जातात. कायद्यासाठी आणि सुरक्षा यंत्रणेसाठी सर्वांना समान न्याय असतो. त्यामुळे सर्वांवरच कारवाई होणार हे निश्चित आहे. सुजाण नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होऊन पोलिसांसमवेत कर्तव्य बजवावे, असेही सांगण्यात आले. (प्रतिनिधी)