Join us

नाकाबंदीच्या वेळीच कारवाई

By admin | Published: September 14, 2016 4:58 AM

नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना जरब बसावी, यासाठी दुप्पट ते दहापट दंड आकारण्याचा नियम केला जात असतानाच, आता दुसरीकडे एका अजब कार्यालयीन आदेशामुळे वाहतूक पोलीस संभ्रमात पडले आहेत.

मुंबई : नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना जरब बसावी, यासाठी दुप्पट ते दहापट दंड आकारण्याचा नियम केला जात असतानाच, आता दुसरीकडे एका अजब कार्यालयीन आदेशामुळे वाहतूक पोलीस संभ्रमात पडले आहेत. नाकाबंदीच्या वेळीच वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करावी. इतर वेळी कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश नुकतेच देण्यात आले आहेत. त्यामुळे सिग्नलजवळ किंवा अन्य ठिकाणी होणारी कारवाई थांबतानाच वाहन चालकांकडून आणखी अरेरावी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाहनांची तपासणी, तसेच इतर वाहतूक कारवाई करत असताना पोलीस ठाणे व वाहतूक विभागात समन्वय राहात नाही. त्यामुळे नाकाबंदी लावून मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाईबाबत वाहतूक पोलीस मुख्यालयाकडून एक परिपत्रकच वाहतूक पोलिसांसाठी काढण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार वाहतूक पोलिसांनी कारवाई स्थानिक पोलीस ठाण्याच्या अंमलदारांसमवेत करण्याची सूचना केली आहे. पोलिसांवरील हल्ले रोखण्यास मदतपोलिसांवरील हल्ले रोखण्यासाठी मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी दखल घेत, नाकाबंदी दरम्यान कारवाई करण्याचे आदेश काढले. पोलिसांकडून प्रमुख ठिकाणांवर दिवसातून दोन ते तीन वेळा नाकाबंदी घेण्यात येते. यामध्ये मुंबईतील प्रमुख ठिकाणे, चेकनाका, द्रुतगती मार्गांसह संवेदनशील ठिकाणांचा समावेश असणार आहे. नियम मोडणाऱ्यांनो सावधान!या नाकाबंदीवेळी दारू पिऊन वाहन चालवणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, सिग्नल नियम मोडणे, मोबाइलवर बोलताना वाहन चालविणाऱ्यांसह नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, अशा वेळी काही ठिकाणी वैयक्तिकरीत्या बंदोबस्ताला असणाऱ्या वाहतूक पोलिसांवर मात्र, अशा वेळी कारवाई न करण्याची नामुष्की ओढावली आहे, तेथे या चालकांची सुटका होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे. नाकाबंदी व्यतिरिक्त कोणीही अधिकारी, तसेच अंमलदार कारवाई करताना आढळल्यास अशा अधिकारी अंमलदार व संबंधित विभागाच्या वरिष्ठांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. या संदर्भात मुंबई पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांना विचारले असता, सर्व वेळी कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, परिपत्रकातील नाकाबंदीशिवाय इतर वेळी कारवाई करू नये, या सूचनेचा नेमका अर्थ दुधे यांना विचारले असता ते सांगू शकले नाहीत. काय म्हटले आहे नव्या आदेशात?नाकाबंदी लावताना वाहतूक विभागातील वरिष्ठांनी स्थानिक पोलीस ठाण्याशी समन्वय ठेवून नाकाबंदीच्या वेळा निश्चित करणे आवश्यक आहे. नाकाबंदी ही वाहतुकीच्या ‘पीक अवर्स’मध्ये असणार नाही, याची दक्षता घेण्यासही सांगण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, करण्यात आलेल्या तिसऱ्या सूचनेमुळे वाहतूक पोलिसांमध्ये चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे. वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा, तसेच इतर कायद्यान्वये करावयाची दंडात्मक वा अंमलबजावणी कारवाई ही फक्त नमूद नाकाबंदीच्या वेळीच करण्यात यावी. इतर वेळी कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, असे स्पष्ट केले आहे. या परिपत्रकाचे वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, अपर पोलीस आयुक्त यांना पालन करण्याची सूचनाही केली आहे. नाकाबंदीशिवाय इतर वेळी कारवाई केली नाही, तर वाहतूक नियम उल्लंघनाचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.