मुंबई : मुंबईच्या विविध भागांत चांगले मोबाइल नेटवर्क मिळवण्यासाठी अनधिकृतपणे बुस्टर लावणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये २२ बुस्टर जप्त करण्यात आले, तर १४ ठिकाणी अशा प्रकारचे बुस्टर त्वरित काढून टाकण्याची नोटीस देण्यात आली.
टेलिकम्युनिकेशन मंत्रालयाच्या वायरलेस मॉनिटरिंग विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये निवासी व व्यावसायिक दोन्ही ठिकाणांचा समावेश आहे. ठाणे, दादर, झवेरी बाजार, विलेपार्ले पूर्व, एमजी रोड, ग्रँट रोड, डोन्टाड स्ट्रीट, जे.बी. नगर, काळबादेवी रोड, सीपी टँक रोड, नायगाव क्रॉस, बेलासिस रोड, फणसवाडी, शमसेट स्ट्रीट या ठिकाणी धाड घालून कारवाई करण्यात आली. ज्या ठिकाणी अशा बुस्टरची अनधिकृत विक्री केली जाते त्या ठिकाणीही कारवाई करण्यात आली.अनधिकृतपणे बुस्टर लावल्याने इतर ग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. वारंवार कॉल ड्रॉप होणे, इंटरनेटचा वेग कमी होणे असे प्रकार इतरांना सहन करावे लागतात. कोट्यवधी रुपये खर्च करून स्पेक्ट्रम खरेदी करून ग्राहकांना चांगले मोबाइल नेटवर्क मिळावे यासाठी प्रयत्न करणाºया मोबाइल कंपन्यांना या अनधिकृत बुस्टरचा मोठा आर्थिक फटका बसतो. त्यामुळे असे प्रकार करणाºयांविरोधात कडक कारवाईचे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती अधिकाºयांकडून देण्यात आली.सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडिया (सीओआयए)चे महासंचालक राजन मॅथ्यू याबाबत म्हणाले की, मोबाइल कंपन्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा तयार करत असताना अशा प्रकारे अनधिकृतपणे चालणाºया व सर्रास होणाºया प्रकारांमुळे आमच्या आव्हानांमध्ये अधिक वाढ होत आहे. यामुळे केवळ मोबाइल कंपन्यांचेच नुकसान होत नाही तर याचा वापर करणाºया मोबाइल ग्राहकांनादेखील नेटवर्कसाठी नेहमीपेक्षा अधिक बॅटरी वापरावी लागते.असे गैरप्रकार करणाºयांविरोधात सरकारने ठोस भूमिका घेऊन कारवाईचे पाऊल उचलल्याबाबत त्यांनी सरकारचे आभार व्यक्त केले. तसेच अशा प्रकारे सातत्याने कारवाई करण्याची मागणी केली.