पाच मिनिटांच्या विलंबामुळे बस चालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 05:17 AM2019-03-01T05:17:32+5:302019-03-01T05:17:35+5:30
कर्मचाऱ्यांची तक्रार : जाणीवपूर्वक निलंबन केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचे अध्यक्षांचे निर्देश
मुंबई : शहरात वाढत्या वाहतूककोंडीमुळे बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांना ब्रेक लागत आहे. यामुळे बसगाडी नियोजित वेळेत आगारात पोहोचत नसल्याचा भुर्दंड बस चालक व वाहकांना बसत आहे. अधिकारी त्यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई करीत असल्याची तक्रार बेस्ट समितीपुढे करण्यात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक निलंबित करणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्याचे निर्देश बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.
बसगाडी पाच ते दहा मिनिटे बस आगारात उशिरा पोहोचल्यास संबंधित बस चालकावर कारवाई करण्यात येते. एखाद्या कर्मचाºयाने दोन दिवस अधिक सुट्टी घेतल्यास लगेचच अधिकारी चार्जशीट देण्यात येते. पाच वेळा चार्जशीट दिल्यानंतर त्या कर्मचाºयावर निलंबनाची कारवाई करण्यात येते, अशी तक्रार बेस्ट समितीचे सदस्य सुहास सामंत यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत केली.
सुट्टीच्या दिवशी कर्मचाºयांना कामावर बोलावले जाते, त्या मोबदल्यात रजा देण्याचे ठरले असतानाही अधिकारी त्या कर्मचाºयांना रजा देण्यास टाळाटाळ करतात. वारंवार जाणीवपूर्वक दांड्या मारत असलेल्या कर्मचाºयांवर जरूर कारवाई करावी. एखाद्या कर्मचाºयाचे चुकत असल्यास त्याला समज द्यावी, मात्र त्यांना निलंबित करू नये, अशी मागणी सामंत यांनी प्रशासनाकडे केली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कर्मचाºयांना जाणीवपूर्वक निलंबित करणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्याचे निर्देश बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी प्रशासनाला दिले.
घरी जाऊन करणार प्रबोधन
बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी, अधिक सुट्ट्या घेतल्यानंतर चार्जशीट देण्यात आलेल्या कर्मचाºयांच्या घरी जाऊन त्यांचे प्रबोधन करण्यात येईल. त्यानंतर संबंधित कर्मचाºयांना नोकरीची, कर्तव्याची जाणीव करून देण्यात येईल, असे सांगितले.