वाहनतळांचा वापर न करता रस्त्यावर पार्क होणाऱ्या बसवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 01:25 AM2019-09-20T01:25:24+5:302019-09-20T01:25:27+5:30
६१ ठिकाणांवरील पार्किंग सुविधांचा वापर होण्याऐवजी अवजड वाहनांचे चालक गाड्या अद्यापही अनधिकृतपणे रस्त्यांवर पार्क करीत आहेत.
मुंबई : महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ६१ ठिकाणांवरील पार्किंग सुविधांचा वापर होण्याऐवजी अवजड वाहनांचे चालक गाड्या अद्यापही अनधिकृतपणे रस्त्यांवर पार्क करीत आहेत. अशा ५२ बस व १३ ट्रकवर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईपोटी सुमारे ९ लाख रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. ज्यापैकी १ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
रस्त्यांवर अनधिकृतपणे उभ्या करण्यात येणाºया खाजगी बस, ट्रकमुळे वाहतुकीला अडथळा होऊन वाहतुकीचा वेग मंदावतो. परिणामी, महापालिकेने यावर उपाय म्हणून बेस्टचे २४ डेपो आणि ३७ बस टर्मिनल अशा ६१ ठिकाणी वाजवी दरात खाजगी बस, ट्रक इत्यादी अवजड वाहनांना पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली. याचा वापर केला जात नाही. अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंगसाठी १० हजार दंड, तर टोचन शुल्क म्हणून ५ हजार; याप्रमाणे एकूण रुपये १५ हजार एवढ्या रकमेची आकारणी करण्यात येत आहे. ज्या दिवशी टोचन करण्यात येईल त्याच दिवशी गाडी सोडवून नेली नाही, तर प्रतिदिन २७५ रुपये विलंब आकार वसूल केला जात आहे. ही दंड आकारणी कमाल ३० दिवसांपर्यंत होणार आहे. यानुसार एका अवजड वाहनावर रुपये २३ हजार २५० एवढा कमाल दंड आकारला जात आहे. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिरापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान ५२ बस व १३ ट्रकवर कारवाई करण्यात आली. यामध्ये जी दक्षिण विभागात सर्वाधिक म्हणजे ११ अवजड वाहनांवर त्यानंतर के पूर्व विभागात १० वाहनांवर आणि एन विभागात ७ वाहनांवर कारवाई करण्यात आली़