भांडूपमधील ४० वर्षे जुन्या बांधकामावर पालिकेकडून कारवाई
By सीमा महांगडे | Published: September 2, 2023 06:14 PM2023-09-02T18:14:42+5:302023-09-02T18:14:58+5:30
रस्ता रूंदीकरणासाठी एकूण ६४ बांधकामे निष्कासित
मुंबई - महानगरपालिका क्षेत्रातील भांडूपच्या भट्टीपाडा जंक्शन चौकातील रस्ता रूंदीकरणासाठी अडथळा ठरणाऱ्या ६४ बांधकामाचे निष्कासन महानगरपालिकेमार्फत करण्यात आले. भट्टीपाडा जंक्शन येथील खोत मार्ग, गावदेवी मार्ग, जंगल मंगल मार्ग आणि भट्टीपाडा मार्ग एकत्र येऊन तयार होणाऱ्या चौकासाठी ही बांधकामे अडसर ठरत होती. ही तब्बल ४० वर्षे जुनी बांधकाम निष्कासित केल्याने तेथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
भांडुपमध्ये भट्टीपाडा जंक्शन येथील अरूंद रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. या चौकाच्या रूंदीकरणाचे काम एस विभागामार्फत हाती घेण्यात आले होते. त्यासाठी गुरुवारी उपायुक्त देवीदास क्षीरसागर, एस विभागाचे सहायक आयुक्त महादेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये अभियंता पथकासह अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचाही सहभाग होता. ही कारवाई करण्यासाठी १ पोकलेन, ३ जेसीबी, ६ डंपर, १० अधिकारी आणि ४९ कामगार तैनात होते. तसेच भांडूप पोलिसांकडून पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला होता.
भट्टीपाडा जंक्शन चौक रूंदीकरणामुळे टेंबीपाडा, गावदेवी, एन्थॉनी चर्च, छत्रपती शिवाजी महाराज तलाव या भागातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. या भागातील रहिवाशांना भांडूप आणि नाहूर रेल्वे स्थानक येथे जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. आता निष्कासन कारवाईमुळे ब्रिमस्टोवॅड प्रकल्पातील गावदेवी नाला रूंदीकरणाचाही मार्ग मोकळा झाला आहे. या विकासासाठी अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी देखील रितसर परवानगीने करण्यात आली आहे. साधारणपणे ४० वर्षे जुने असलेल्या बांधकामाचे निष्कासन होवून रस्ता रुंदीकरण मार्गी लागणार असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.