Join us  

पालिका अधिकाऱ्यांकडून परवानाधारक विक्रेत्यांवर कारवाई

By रतींद्र नाईक | Published: November 06, 2023 7:57 PM

मोबाईल ऍक्सेसरीज विकणाऱ्या दोघांची सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

मुंबई : दुकानाबाहेरील फुटपाथवर मोबाईल ऍक्सेसरीज विकणाऱ्या विक्रेत्यावर पालिका अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आल्याने अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्याच्या आरोपावरून  गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सदर परिसरात इतर विक्रेत्यांवर पालिका अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केल्याचे निदर्शनास आले नाही असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

मुंबई महापालिकेत लायसन्स इंस्पेक्टर या पदावर काम करणाऱ्या कविता धनावडे या २८ सप्टेंबर २०२० रोजी बेकायदा फेरीवाल्यांविरोधात काम करत असताना मोईउद्दीन शेख याने डी एन रोड, नोव्हेल्टी गुड्स, महेंद्र चेंबर्स येथे दुकानाबाहेर फुटपाथवर मोबाईल ऍक्सेसरीज विकण्यासाठी जागा केली होती तसेच मोबाईलचे इतर साहित्य त्याने त्या ठिकाणी मांडले होते. पालिकेच्या अधिकारी धनावडे या त्या ठिकाणी स्टाफ सह आल्या त्यांनी मोईउद्दीईन शेख याला हटकले, फुटपाथची जागा बळकवल्याचे सांगत त्या साहित्यातील बॉक्स उचलला व त्या पालिकेच्या गाडीत चढू लागल्या त्यावेळी मोईउद्दीन शेख व त्याचा मित्र हकीमुद्दीन    कट्रेलिवाला हा त्यांच्यावर धावून गेला आणि हुज्जत घालू लागला. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी या दोघांविरोधात आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू होता तेव्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश दीपक अलमले यांनी या दोघांची निर्दोष मुक्तता केली.

टॅग्स :न्यायालयमुंबई