Join us

वर्चस्वाच्या चढाओढीत हाणामारी

By admin | Published: June 01, 2016 3:09 AM

आर्थर रोड कारागृहात ‘साले देखता क्या है? आँखे निकालुंगा...’ या वाक्यावरून सुरू झालेला वाद हाणामारीत परावर्तीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे

मुंबई : आर्थर रोड कारागृहात ‘साले देखता क्या है? आँखे निकालुंगा...’ या वाक्यावरून सुरू झालेला वाद हाणामारीत परावर्तीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात १३ आरोपींवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आर्थर रोड तुरुंगात अनेक टोळ्यांचे पाठीराखे आहेत. अरुण गवळी, मुस्तफा डोसा, पप्प्या पुजारी, छोटा राजनचे हस्तक यांची तिथे दादागिरी चालते. मात्र सध्या स्वत:ची वेगळी टोळी चालवित असलेले विशाल आंबेकर आणि मुदस्सर अन्सारी कारागृहात दहशत निर्माण करण्याच्या तयारीत आहेत. १५ दिवसांपूर्वी आंघोळीला जात असताना अन्सारीचा आंबेकरला धक्का लागला. आंबेकरने मुद्दसरला ढकलून दिले. त्यामुळे मुद्दसरने आंबेकरकडे रागाने पाहिले. या वेळी आंबेकरने त्याला धमकी दिली होती. येथूनच दोघांमध्ये वाद सुरू झाला. मुद्दसरच्या टोळीतील सुलेमान पटेल, अरबाज खान, गोपाल शेट्टी आणि सरवर खान यांनी आंबेकरवर हल्ला चढविण्याचा कट आखला होता. कँटिनमधील अ‍ॅल्युमिनिअमची ताटे घासून त्यांनी कापरीसारखे शस्त्र तयार केले होते. सोमवारी वाद सुरू होताच मुद्दसरची टोळी त्यांच्यावर तुटून पडली. तिथे पोहोचलेल्या पोलिसांनाही मार खावा लागला. सहा जण जखमी झाले होते. त्यांच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी विशाल अंबेकरच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. मुद्दसर अन्सारीच्या तक्रारीवरून दुसऱ्या गटातील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परस्पर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. तर कारागृह विभागाने या १३ जणांविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल केला आहे, असे वरिष्ठ निरीक्षक अहमद पठाण यांनी सांगितले.