नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीत प्रकल्पग्रस्त कृती समितीनेही उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. वाशी येथे झालेल्या कौटुंबिक मेळाव्यात याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार तीन दिवसांत दोनही मतदार संघांचे उमेदवार घोषित केले जाणार आहेत. शहरातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीने सातत्याने पाठपुरावा केला आहे. आवश्यक त्या वेळी सिडको आणि महापालिकेवर मोर्चे देखील काढलेले आहेत. परंतु अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेतूनही अद्याप काही निष्पन्न झालेले नाही. त्यानुसार कृती समितीने केलेल्या पाठपुराव्यांचा आढावा घेणारी बैठक वाशी येथे झाली. याप्रसंगी नवी मुंबईच्या विकासात प्रकल्पग्रस्त आहेत की नाहीत, असा प्रश्न पडत असल्याची भावना डॉ. राजेश पाटील यांनी व्यक्त केली आहे. प्रकल्पग्रस्तांची घरे पाडली जात आहेत. क्लस्टरच्या नावाखाली गावे उद्ध्वस्त होणार आहेत. शिक्षण संस्थांच्या साम्राज्यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना स्थान मिळत नाही, तर राजकीय नेत्यांकडून निराशाच पदरी पडलेली असल्याचेही ते म्हणाले. प्रकल्पग्रस्तांप्रमाणे इतर जनतेचेही तेच हाल होत आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहर हे सिंगापूर नसून एखाद्या आदिवासी पाड्याप्रमाणे असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पर्यायी प्रकल्पग्रस्तांना स्वत:च आपली व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवेल असे नेतृत्व कृती समितीच्या माध्यमातून पुढे केले जाणार आहे. याकरिता बेलापूर आणि ऐरोली या दोनही मतदार संघात उमेदवार उभे केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नवी मुंबईत ६५ हजारांहून अधिक प्रकल्पग्रस्त आहेत. शिवाय इतर नागरिकांचाही समितीला पाठिंबा आहे. एका व्हिजनमार्फत कृती समिती त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. येत्या तीन दिवसांत कृती समिती उमेदवारांची घोषणा करेल. समितीचे हे उमेदवार कोणाला मदतीसाठी उभे राहणार नसून जिंकण्यासाठी लढणार असल्याचेही पाटील यांनी ठामपणे सांगितले. (प्रतिनिधी)
कृती समिती निवडणूक रिंगणात
By admin | Published: September 22, 2014 1:09 AM