मुंबई : मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेनंतर महापालिकेने कंत्राटदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडच्या दुरवस्थेप्रकरणी महापालिकेने कंत्राटदाराला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
महापालिकेकडून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रस्त्याच्या दुरवस्थेवर कडक कारवाई करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सध्या रस्त्यांच्या खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना ही कारवाई करण्यात आली. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडची देखभाल करण्याची जबाबदारी ही बीपीएससीपीएल आणि विशाल कन्स्ट्रक्शन यांच्या जॉईंट व्हेन्चरची होती. मात्र त्यांनी रस्त्याची योग्य देखभाल न केल्याने त्यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच चार दिवसात रस्ता दुरुस्त करण्याची तंबी देण्यात आली आहे.
रस्त्याच्या खराब कामगिरीबाबत आतापर्यंत पाच हजार रुपयांचा दंड होत असे. मात्र आता कंत्राटदारांना चार दिवसांची मूदत देत एक लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. लिंक रोडवरील तीन किलोमीटर पॅचची अवस्था भीषण आहे. जागोजागी खड्डे असल्याच्या अनेक तक्रारी या महापालिका आयुक्तांकडे याआधी आल्या होत्या. यानंतर आता महापालिका आयुक्तांनी एक बैठक आयोजित करून हा निर्णय जाहीर केला आहे.