Join us

बारमध्ये नाचण्यावरून हाणामारी

By admin | Published: October 25, 2015 12:31 AM

बारमध्ये नाचण्यावरून झालेल्या वादात वेटरसह मध्यस्थीला मारहाणीची घटना शुक्रवारी मध्यरात्री जुहूगाव येथे घडली आहे. यामध्ये एकाला गंभीर दुखापत झाली असून, तिघांविरोधात

नवी मुंबई : बारमध्ये नाचण्यावरून झालेल्या वादात वेटरसह मध्यस्थीला मारहाणीची घटना शुक्रवारी मध्यरात्री जुहूगाव येथे घडली आहे. यामध्ये एकाला गंभीर दुखापत झाली असून, तिघांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जुहूगाव येथील मॅग्नेट बारमध्ये शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. मद्यपान करण्यासाठी आलेल्या ग्राहकांपैकी काही जण बारमधील मोकळ्या जागेत नाचण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी बारच्या वेटरने त्यांना नाचण्यास विरोध केला. याचा राग आल्याने तीन ग्राहकांनी त्या वेटरला मारहाण करायला सुरुवात केली. वेटरला होत असलेली मारहाण पाहून शिवा मुडिगेरे यांनी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली. परंतु त्या तिघांना शिवा यांनी केलेल्या मध्यस्थीचादेखील राग आला. यामुळे त्यांनी शिवा मुडिगेरे यांना ओढत बारच्या बाहेर नेले. तिथे लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन त्यांनी खेचून चोरून नेली. या संपूर्ण प्रकारात मुडिगेरे यांना गंभीर दुखापत झाली झाली आहे. त्यानुसार घडलेल्या घटनेप्रकरणी त्यांनी १ लाख ३० हजार रुपये किमतीची चेन चोरीची तसेच मारहाणीची तक्रार पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार वाशी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद पाटील (४५), प्रदीप पाटील (३५) व नरेश पाटील अशी त्यांची नावे आहेत. मात्र मारहाण केल्यानंतर तिघेही फरार झाले असून, शनिवारी संध्याकाळपर्यंत पोलीस त्यांचा शोध घेत होते. डान्सबारला पुन्हा परवानग्या मिळण्याच्या हालचाली असल्याने हौसी ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे बारमध्ये नाचण्याची हौस पूर्ण करण्याच्या प्रयत्नात ग्राहकांकडून हा प्रकार झाला आहे. यावरून भविष्यात पुन्हा डान्सबार सुरू झाल्यास बारगर्लऐवजी हौसी मद्यपी पुरुषच नाचताना अधिक दिसण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)