Join us

कारवाई, कोंडी, लाठीचार्ज...

By admin | Published: May 27, 2015 12:40 AM

गोठीवली येथे उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींवर सिडकोने कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाई करून त्या जमीनदोस्त केल्या.

नवी मुंबई : गोठीवली येथे उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींवर सिडकोने कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाई करून त्या जमीनदोस्त केल्या. या कारवाईला प्रकल्पग्रस्तांनी तीव्र विरोध दर्शविल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने यावेळी दगडफेक केल्याने दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान, कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंधरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोने अतिक्रमणांच्या विरोधात धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज गोठीवली येथील दोन अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरविण्यात आला. सिडको आणि महापालिकेच्या वतीने आज सकाळी ११ वाजल्यापासून ही संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली. मात्र संतप्त ग्रामस्थांनी या कारवाईला विरोध दर्शवित ठाणे-बेलापूर मार्गावर ठिय्या मांडला. त्यामुळे जवळपास पाऊण तास या मार्गावरील वाहतूक यंत्रणा ठप्प झाली. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलकांना आवरण्याचा प्रयत्न केला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे प्रक्षुब्ध झालेल्या आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केल्याने दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकारानंतर पोलिसांनी भाजपाचे युवा नेते वैभव नाईक यांच्यासह १५ जणांना ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)या कारवाईसाठी २५0 पोलीस कर्मचारी, ४0 सिडकोचे कर्मचाऱ्यांची फौज तैनात ठेवण्यात आली होते. तीन पोकलेन व एका क्रशरच्या साहाय्याने संध्याकाळी ६.३0 पर्यंत तीन व चार मजल्याच्या दोन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. दरम्यान, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.